यंत्रसामुग्रीवर भाडे आकारणी; पदाधिकारी विरुद्ध प्रशासन

By Admin | Published: April 16, 2017 12:10 AM2017-04-16T00:10:20+5:302017-04-16T00:10:20+5:30

महपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामग्रीवर भाडे आकारणी करण्यात आल्याने प्रशासन आणि पदाधिकारी समोरासमोर ठाकले आहेत.

Rental of machinery; Officer Against Administration | यंत्रसामुग्रीवर भाडे आकारणी; पदाधिकारी विरुद्ध प्रशासन

यंत्रसामुग्रीवर भाडे आकारणी; पदाधिकारी विरुद्ध प्रशासन

googlenewsNext

टँकर पुरविण्यावेळी वाद : आमसभा गाजण्याचे संकेत
अमरावती : महपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामग्रीवर भाडे आकारणी करण्यात आल्याने प्रशासन आणि पदाधिकारी समोरासमोर ठाकले आहेत. महापालिका प्रशासनाने टँकरसह जेसीबी, रोडरोलर, टिप्पर पुरविण्याच्या मोबदल्यात प्रति तास शुल्क आकारणी निश्चित केली आहे. तथापि आम्ही लोकांचेच काम करतो, या सबबीखाली बहुतांश नगरसेवकांनी भाडेआकारणीला विरोध दर्शविला आहे. पाण्याचा टँकरसाठी महापालिका प्रतितास ६७७ रुपये आणि लोडर ट्रॅक्टरसाठी ११२० रुपये प्रतितास आकारत असल्याने पदाधिकारी-प्रशासनातील वाद अधिक गडद होण्याचे संकेत आहेत.
महापालिकेकडे असलेल्या यंत्रसामग्री तथा मशिनरी यावरील इंधन, वाहनचालक व त्यासंबंधी इतर बाबींवर वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात खर्च होत आहे. तसेच यंत्रसामूग्री तथा मशिनरीचे आयुष्य पूर्ण झाल्याने त्यावरील देखभाल व दुरूस्तीसाठी मोठा खर्च होत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेची आर्थिक परिस्थिती सबळ नसल्याने नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवून आयुक्तांनी ६ फेब्रुवारीपासून मनपाकडील यंत्रसामग्री वापराबाबत भाडेवसुलीचे निर्देश दिले. त्यासाठी जेसीबी, रोडरोलर, बॉबकट, टँकर, ट्रॅक्टरचे प्रति तास भाडेही निश्चित करून दिले. आलेल्या निधीमधून भविष्यात नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. फेब्रुवारीत आदेशाची अंमलबजावणी केली. मात्र मागील आमसभेत विरोधी पक्षनेत्यांसह बसपचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत आवाज उठविला. ६७७ रुपये प्रतितास टँकरच्या भाडे आकारणीवर आक्षेप घेण्यात आला. टँकर असो वा जेसीबी प्रभागातील कामासाठी वापरला जातो. त्याचे भाडे आम्ही का भरावे, किंवा ती रक्कम आमच्या वॉर्ड विकास निधीतून का कपात करायची, असा बहुतांश नगरसेवकांचा प्रश्न आहे. शुल्क भरल्याशिवाय टँकर पाठविला जाणार नाही, असे सांगितले जाते, असे उदाहरण उद्धृत करून काँग्रेसच्या नगरसेविका निलिमा काळे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले होते. (प्रतिनिधी)

नगरसेवकांनाही ‘चार्ज’
महापालिकेच्या नगरसेवकांकडून खासगी जागेवर कामे सुचविण्यात आल्यास नव्या दरपत्रकाप्रमाणे नगदी स्वरुपात रक्कम वसूल करूनच कामे करावीत, असे आयुक्तांचे निर्देश आहेत.
वाहननिहाय हिशेब ठेवण्याचे निर्देश
यंत्रसामग्री वापराबाबत नव्या दराने भाडे आकारणीसाठी स्वतंत्र पावती पुस्तक ठेवण्यात यावे, तसेच शासकीय ठिकाणी कामे करावयाची असल्यास नगरसेवकांच्या वॉर्ड विकास निधीमधून रक्कम वजा करण्याकरिता वाहननिहाय स्वतंत्र हिशेब ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
-तर वाहनचालकांवर कारवाई
कोणत्याही परिस्थितीत खासगी ठिकाणी विनापरवानगी महापालिकेच्या वाहनाचा वापर करू नये, केल्यास नगदी दंडासह वसुली करण्यात यावी व मंजूर असल्यास शासन नियमाप्रमाणे शुल्क वसूल करावे, परवानगीशिवाय तसेच मनपा हद्दीबाहेर कोठेही वाहन आढळल्यास वाहनचालक जबाबदार राहील. वाहनचालकाला जबाबदार धरून प्रथम वेतनातून वसुली व दुसऱ्यांदा आढळल्यास प्रशासकीय दंडनीय कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Rental of machinery; Officer Against Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.