पाच व्यापारी संकुलांचे भाडे दर समितीद्वारे निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:44+5:302021-07-20T04:10:44+5:30
अमरावती : महापालिकेच्या मालकीची पाच संकुल व मुख्य इमारतीमधील एक बँक यांच्या भाडेपट्ट्यांची लिज संपलेली आहे. त्यामुळे शासनादेशानुसार गठीत ...
अमरावती : महापालिकेच्या मालकीची पाच संकुल व मुख्य इमारतीमधील एक बँक यांच्या भाडेपट्ट्यांची लिज संपलेली आहे. त्यामुळे शासनादेशानुसार गठीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दर निश्चिती केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
महापालिकेचे बीओटी तत्त्वावरील दादासाहेब खापर्डे व्यापारी संकुल, प्रियदर्शनी व्यापारी संकुल, सुरज बिल्डर्स व्यापारी संकुल , बडनेरा येथील महात्मा गांधी व्यापार संकुल, जवाहर गेट व्यापारी संकुल व मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पंजाब नॅशनल बँक यांचा लिज कालावधी १३ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची ९ जुलै रोजी बैठक झाली. यामध्ये महापालिका आयुक्त व सहजिल्हा निबंधक (मुद्रांक) उपस्थित होते
यामध्ये बाजारमूल्याच्या अनुषंगाने मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या आठ टक्के किंवा बाजारभावानुसार निश्चित होणारे वार्षिक भाडे, यापैकी जे जास्त असेल तेवढे भाडे या समितीने निश्चित केल्याची माहिती आहे.
बॉक्स
समितीने निश्चित केलेले भाडे
दादासाहेब खापर्डे व्यापारी संकुल तळमजला ४९ रुपये व वरचा मजला ४३ रुपये चौरस फूट, प्रियदर्शनी व्यापारी संकुल तळमजला ४६ रुपये व वरचा मजला ४१ रुपये चौरस फूट, सूरज बिल्डर्स व्यापारी संकुल ४३ रुपये चौरस फूट, जवाहर गेट व व्यापारी संकुल तळमजला ४५ रुपये व वरचा मजला ३९ रुपये चौरस फूट व मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पंजाब नॅशनल बँकेला ४३ रुपये चौरस फूट अशी भाडेदर आकारणी असल्याची माहिती आहे.
बॉक्स
नवाथे मल्टीप्लेक्स पुन्हा गाजणार
नवाथे मल्टीप्लेक्सच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये मतभेद असल्याने मंगळवारच्या आमसभेत हा विषय पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. पीएमसी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून मागच्या आमसभेत बरीच ताणाताणी झाली होती. यामध्ये इमारतीच्या बांधकामाची नव्याने प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाद्वारे हा विषय समोर येण्याची शक्यता आहे.