पेढी नदीवरील पुलाच्या कठड्यांची होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:31 AM2019-04-25T01:31:40+5:302019-04-25T01:34:02+5:30
वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला. पुलावरील कठड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. सदर पूल ब्रिटिशकालीन असून, पुलाने एक शतक पार केले आहे.
पेढी नदीवरील पुलाची उंची जमिनीपासून २५ मीटर असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. १५ वर्षांपूर्वी बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता धनंजय धवड यांनी पेढी नदीच्या पुलाचे फाऊंडेशन कायम ठेवून कँटिलियर वाइंडिंग पद्धतीने पुलाच्या दोन्ही बाजूला दीड मीटरने रुंदी वाढविली होती. म्हणजे पूर्वीचा साडेचार मीटर रुंदीचा पूल साडेसात मीटरचा केला होता. तेव्हापासून पूलावर एकही मोठा अपघात झाला नाही.
सदर पुलावरून दररोज दहा हजारांहून अधिक वाहने ये-जा करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. आता आठवडाभरात दोन वेळा पुलावर अपघात झाले आहेत. भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बाजूचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला होता. दुसरा अपघातसुद्धा याच पूलावर झाला. खासगी बस व ट्रकमध्ये आमने-सामने धडक झाल्याने दोन तास वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती. या अपघातानंतर पूलावर गर्दी झाली होती.
आठवड्यातच दोन अपघातांमुळे सदर पूल चर्चेत आला. घटनास्थळी आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यासंदर्भात त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा केली आहे.
जिल्ह्यात ६२ ब्रिटिशकालीन पूल
जिल्ह्यात लहान-मोठे ६२ ब्रिटिशकालीन पूल असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. कोकणातील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. तेव्हा जिल्ह्यातील ६२ पुलांचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. पूल सुस्थितीत असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. वलगावच्या पुलाएवढीच उंची आसेगाव पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पूलाची असल्याची माहिती आहे.
वर्दळीचा पूल
अमरावतीला चांदूर बाजार, परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, धारणी या प्रमुख शहरांना जोडणारा हा पूल असल्याने त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. वलगाव पोलीस ठाणे येथून हाकेच्या अंतरावर आहे. आठवडाभरात दोन अपघात झाल्याने सायकल, दुचाकीने जाणाºया प्रवाशांमध्ये दडपण तयार झाले आहे. वलगाव पोलिसांनी भरधाव वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलावीत आणि प्रवाशांना अभय द्यावे, अशी मागणी होत आहे.
पुलाचे कठडे दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येत आहेत. आणखी किमान पाच दिवस लागणार आहेत. जनरेटरच्या माध्यमातून काँक्रीट ब्रेकिंग करून कामे करावी लागणार आहे. आता पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेट्स लावले आहेत.
- विनोद बोरसे, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती.