‘ओडीएफ’ दाव्याची पुनर्पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:28 PM2018-07-06T22:28:31+5:302018-07-06T22:29:10+5:30
शहर हगणदरीमुक्त (ओडीएफ) झाल्याच्या दाव्याची पुनर्पडताळणी करण्यासाठी केंद्राचे एकसदस्यीय पथक शहरात दाखल झाले आहे. स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत हे त्रयस्थ संस्थेकडून होणारे परीक्षण असून, ते पथक त्यांचा अहवाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाला पाठविणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर हगणदरीमुक्त (ओडीएफ) झाल्याच्या दाव्याची पुनर्पडताळणी करण्यासाठी केंद्राचे एकसदस्यीय पथक शहरात दाखल झाले आहे. स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत हे त्रयस्थ संस्थेकडून होणारे परीक्षण असून, ते पथक त्यांचा अहवाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाला पाठविणार आहेत.
राज्यातील नागरी भाग २ आॅक्टोबर २०१७ रोजी हगणदरीमुक्त घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने अमरावती शहर हगणदरीमुक्त झाल्याचे नगरविकास मंत्रालय व स्वच्छ महाराष्टÑ अभियान संचालकांकडून कळविण्यात आले. मात्र, त्याच वेळी शहरात जे १६ ओडी स्पॉट (उघड्यावर ज्या ठिकाणी शौच होते, त्या जागा) आहेत, ते कायमचे हद्दपार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने हगणदरीमुक्त शहराची ओळख टिकविण्यासह ओडी स्पॉट हद्दपार करण्यात पालिकांना यश मिळाले की कसे, हे पाहण्यासाठी एप्रिल ते जुलै दरम्यान ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ केले जात आहे. अमरावती शहरासाठी क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाने रोहितकुमार मिश्रा या असेसरची नियुक्ती केली आहे. ते दोन दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन ओडीएफचा दर्जा तपासत आहेत.
शाश्वत दर्जा टिकविण्यावर भर
‘शहर हगणदरीमुक्त’ प्रमाणपत्राच्या मानसिकतेपुरते मर्यादित न राहता, शहरांनी हगणदरीमुक्तीचा दर्जा शाश्वतरीत्या टिकवावा, अशी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना आहे. त्या अनुषंगानेच हगणदरीमुक्त घोषित झालेल्या अमरावती शहराचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्यात येत आहे.