पुन्हा दमदार पाऊस, शेतकऱ्यांसाठी आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:06 PM2018-09-16T22:06:03+5:302018-09-16T22:06:47+5:30
जिल्ह्यात २० सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा अनुशेष भरून निघण्याचे संकेत आहे.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २० सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा अनुशेष भरून निघण्याचे संकेत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून सध्या मध्य भारतासह बहुतांश ठिकाणी मान्सून कमकुवत आहे. एकूण पावसाची सरासरी तूट ९ टक्केपर्यंत पोहोचली आहे. परंतु, आता थोडी आशेची किरणे दिसत असून मंगळवारपर्यंत मध्य व उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनच्या समुद्रात सक्रिय दोन चक्रीवादळे 'बारीजात आणि मानगूट', बंगालच्या उपसागराकडे सरकत आहेत. परंतु त्यांची शक्ती कमी होत असून, हे दोन वादळे बंगालच्या उपसागरातील पूर्व भागात एकत्र आल्याने चक्राकार वारे तयार झाले आहेत. ही हवामान प्रणाली सोमवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्रात परावर्तीत होईल. सदर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन ते पश्चिम-दोशेने प्रवास करण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. परंतु या प्रवासात हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सिस्टीम पश्चिम मध्यप्रदेश पर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत हमी नाही. वरील सर्व स्थितीनुसार २० तारखेपासून ओरिसा आंध्र या भागात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, तर मध्य भारतातसुद्धा याचा फायदा होईल. शक्यतोवर पूर्व विदर्भात यामुळे २१ ते २४ चांगला पाऊस पडेल, तर पश्चिम विदर्भात मात्र कमी जास्त प्रमाण राहील. हे कमी दाबाचे क्षेत्र जर २१, २२ सप्टेंबरपर्यंत टिकले, तर मात्र अमरावती बुलडाणा भागातसुद्धा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातपुडा क्षेत्रात या पावसाच्या पाण्याने धरणे भरण्यास मदत होईल.
जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस
रविवारी दुपारी १.३० ते २.३० वाजता दरम्यान जिल्ह्यातील काही परिसरात तुरळक पावसाच्या सरी बसरल्या. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवली.