लग्नाच्या नावावर वारंवार शोषण; अल्पवयीन मुलीच्या पोटी आली ‘नकोशी’
By प्रदीप भाकरे | Published: November 2, 2022 06:11 PM2022-11-02T18:11:01+5:302022-11-02T18:13:13+5:30
तरुणाविरुद्ध गुन्हा
अमरावती : लग्नाचे प्रलोभन देऊन एका अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून गर्भधारणा होऊन तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिला नाकारल्याने ती नवजात कन्या ‘नकोशी’ ठरली. या प्रकरणी धारणी पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी आरोपी रोहित बाबूराव भिलावेकर (१८, रा. बारू, ता. धारणी) याच्याविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारीपूर्वी आरोपीने तिचे वारंवार शोषण केले. आरोपी व फिर्यादी अल्पवयीन मुलगी हे धारणी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील रहिवासी आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांमध्ये संवाद वाढला. त्यातून त्याने तिला लग्न करू, संसार करू, असे प्रलोभन दिले. लग्न करतोच, असे आश्वासन देत त्याने अनेकदा तिचे शोषण केले. त्यामुळे ती १७ वर्षीय कुमारिका गर्भवती राहिली. आरोपी रोहित हा आपल्याशी लग्न करेलच, अशा भाबड्या आशेपोटी तिने तिच्या गर्भधारणेची बाब कुटुंबीयांना सांगितली नाही.
दरम्यान, तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. ते आरोपीलादेखील कळविण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्याने लग्नास नकार देऊन पितृत्व नाकारले. अखेर १ नोव्हेंबर रोजी तिने धारणी पोलीस ठाणे गाठून आरोपी रोहित भिलावेकरविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.