अंबानगरीत पुन्हा खुलेआम गुटखा विक्री
By admin | Published: November 7, 2016 12:26 AM2016-11-07T00:26:12+5:302016-11-07T00:26:12+5:30
अंबानगरीत पुन्हा गुटख्याची खुलेआम विक्री करण्यात आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.
एफडीएचे दुर्लक्ष : अन्न सुरक्षा मानदे कायद्याची पायमल्ली
संदीप मानकर अमरावती
अंबानगरीत पुन्हा गुटख्याची खुलेआम विक्री करण्यात आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांनी डोके वर काढले आहे.
विदर्भातून अमरावतीत सर्वात जास्त गुटखा विक्री होत आहे. येथील निष्क्रिय एफडीएच्या अधिकाऱ्यांमुळे अवैध गुटखा विक्री फोफावली आहे. त्यामुळे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवार्इंचा बडगा का उगारु नये, असा सवाल अंबानगरीतील जनतेला पडला आहे. शहरात गुटख्याचे अनेक मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडूनच किरकोळ व्यापारी गुटख्याची खरेदी करतात. काही महिन्यांपूर्वी एफडीएची यंत्रणा निकामी झाल्यामुळे व शहरात वाढता गुटखा विक्रीच्या प्रमाणामुळे खुद्द जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी धाडी टाकून कारवाई केली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करून आॅनकॅमेरा या गुटख्यांची होळी करण्यात आली होती. ही एफडीएला दिलेली चाप होती. पण एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. उलट आम्ही गेंड्याची कातडी लावून बसलो आहे. आमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशीच भूमिका अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची असते. त्यामुळे अशा निष्क्रिय व बेजबाबदार अधिकाऱ्यांना अन्न व पुरवठा मंत्र्यांचे अभय का, असा प्रश्नही पुढे आला. आंब्यांच्या मोसमात कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे विकले जात होते. तसा प्रकार 'लोकमत'ने पुराव्यानिशी लोकदरबारात मांडल्यानंतर नागरिक जागृत झाले. या गंभीर प्रकाराला त्यांनी विरोधही दर्शविला होता. आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड वापरल्याचा अहवाल प्रयोगशाळेच्या तपासाअंती नमुनेसुध्दा दोषी आढळले आहेत. त्यामुळे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात एफडीएच्या कारवायाच होत नाहीत. बोटावर मोजण्या इतपत कारवाया झाल्यात. पण त्यानंतर कारवाई थंडबस्त्यात पडल्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांनी पुन्हा आता डोके वर काढले आहे. त्यामुळे एकतर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, ही कारवाई केली जात नसेल तर एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी येथील अधिकाऱ्यांवर कारवार्इंचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक पाणटपरींवर
मिळतो गुटखा
राज्यात सर्वत्र गुटखाबंदी लागू असतानाही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे गुटखा विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. प्रत्येक पाणटपरीवर सहज गुटख्याच्या पुड्या व सुंगधीत तंबाखू उपलब्ध होतो. पूर्वी २ रुपयांत मिळणारी गुटख्याची पुडी दामदुप्पट भावने म्हणजे ५ रुपयांत विकली जात आहे. खर्ऱ्याचेही भाव वाढविण्यात आले आहे. त्यामुळे एका अर्थाने गुटखा खाणाऱ्यांची अप्रत्यक्षरीत्या लूट करण्यात येत आहे.