उपायुक्तांची बदली, शेटे अतिरिक्त आयुक्त?

By admin | Published: June 17, 2016 12:17 AM2016-06-17T00:17:17+5:302016-06-17T00:17:17+5:30

महापालिकेचे उपायुक्त (सामान्य) चंदन पाटील यांची गोंदिया नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

Replacement of Deputy Commissioner, Sheet Additional Commissioner? | उपायुक्तांची बदली, शेटे अतिरिक्त आयुक्त?

उपायुक्तांची बदली, शेटे अतिरिक्त आयुक्त?

Next

अमरावती : महापालिकेचे उपायुक्त (सामान्य) चंदन पाटील यांची गोंदिया नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने पाटील यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश बुधवारी जारी केलेत. उपायुक्त चंदन पाटील यांची पदस्थापना करत असताना नव्या उपायुक्तांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र शासकीय संकेत स्थळावर ‘जीआर’ अपलोड करण्यात आलेला नाही.
तथापी सोमनाथ शेटे यांची अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आल्याचीही माहिती आहे. शेटे हे मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी आहेत. तीन वर्षांपूर्वी अमरावती महापालिकेसह अन्य काही महापालिकांसाठी अतिरिक्त आयुक्त हे नवीन पद निर्माण करून त्याला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार सोमनाथ शेटे हे अमरावती महापालिकेचे पहिले अतिरिक्त आयुक्त असतील. नगरविकास विभागाचे १५ जूनला उपसचिव ज. ना. पाटील यांच्या स्वाक्षरीने शेटेंच्या पदस्थापनेचे आदेश निघाल्याची चर्चा गुरुवारी महापालिकेत होती.
चंदन पाटील यांना गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून स्वतंत्र पदस्थापना मिळाली आहे. पाटील हे महापालिकेत २४ डिसेंबर २०१४ ला उपायुक्त म्हणून रुजू झालेत. डेअरडॅशिंग आणि तरुणतुर्क अधिकारी म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. अमरावती शहराचा स्मार्ट सीटी प्रकल्पामध्ये समावेश होण्यासाठी २५ ते ३० जून दरम्यान फेरप्रस्ताव पाठवायचा आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी पाटील यांच्याकडे असल्याने त्यांची बदली थांबावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)

बदली रद्द करा
चंदन पाटील यांच्या बदली आदेशाची माहिती मिळताच प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अमरावती शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करवून घेण्यासाठी पाटील यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. या प्रकल्पाचा त्यांचा अभ्यास आणि एकंदरीतच कामाची शैली पाहता पाटील यांची बदली करू नये, अशी पालिका प्रशासनाची भूमिका आहे. पाटील यांची अमरावती महापालिकेत असलेली गरज नगरविकास विभागाकडे पोहचती केली जाईल.

अतिरिक्त आयुक्तांकडे स्वतंत्र कारभार
आयुक्तांच्या व्यापक कार्यभारातून काही विभागाची धुरा स्वतंत्रपणे अतिरिक्त आयुक्तांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हेमंत पवार हे नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना त्यांचेकडे शिक्षण आणि स्वच्छता या महत्वपूर्ण विभागाची जबाबदारी होती. शेटे यांच्याकडे सुद्धा व्यापक जबाबदारी येण्याचे संकेत आहेत.

Web Title: Replacement of Deputy Commissioner, Sheet Additional Commissioner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.