हिवाळी परीक्षांचे फेरनियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:32+5:30
विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केले. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. यापूर्वी २१ ते २४ या दरम्यान होणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्राचार्यांना कळविण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणूक कर्तव्यावर परीक्षा विभागातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील ७४ पैकी ६७ कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर जाणार आहेत. यामुळे १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या हिवाळी परीक्षांचे फेरनियोजन चालविले आहे. आता हिवाळी परीक्षा ३० ऑक्टोबरपासून सुरू होतील, अशी तयारी प्रशासनाने केली आहे.
विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केले. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. यापूर्वी २१ ते २४ या दरम्यान होणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्राचार्यांना कळविण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणूक कर्तव्यावर परीक्षा विभागातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षांचे नियोजन करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागणार आहे. परिणामी परीक्षा विभागाने आता ३० ऑक्टोबरपासून हिवाळी परीक्षेचे संचालन करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणूक, दिवाळीच्या सुट्या अशा कारणांनी परीक्षांचे फेरनियोजन करण्यात आले आहे.
अगोदर २१ ते २४ ऑक्टोबर या कालावधीतील पेपर स्थगित करण्यात आले होते. मात्र, बहुतांश कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर तैनात होत आहेत. त्यांचे ९ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षांचे फेरनियोजन करण्यात आले आहे.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा विभाग
नियमित परीक्षेनंतर होणार फेरपरीक्षा
हिवाळी परीक्षा ३० ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे १७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान स्थगित झालेल्या परीक्षा नियमित परीक्षानंतर घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. अभियांत्रिकी परीक्षासोबत नियमित परीक्षा घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.