माहुलीतील वस्तुस्थिती कळवा
By admin | Published: August 31, 2015 11:58 PM2015-08-31T23:58:59+5:302015-08-31T23:58:59+5:30
माहुली येथील उद्रेकाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दंडाधिकारीय चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
नागरिकांना आवाहन : चौकशी अधिकारी म्हणून प्रवीण ठाकरे यांची नियुक्ती
अमरावती : माहुली येथील उद्रेकाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दंडाधिकारीय चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नागरिकांना तेथील वस्तुस्थितीबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहुली येथे घडलेल्या घटनांचा क्रम व कारणमिमांसा, पोलिसांनी हिंसक जमावावर नियंत्रण आणण्यासाठी बळाचा वापर केला काय?, पोलिसांनी केलेली कार्यवाही समर्थनीय आहे किंवा कसे?, या तीन मुद्यांवर तपशीलवार चौकशी करून अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. या चौकशीमध्ये ज्या नागरिकांना घटनेबाबत यथोचित माहिती असेल व ज्यांना यासंबंधी प्रस्तुत माहिती द्यावयाची आहे, अशा सर्व व्यक्तींनी, संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह त्यांची प्रतिज्ञापत्रे उपविभागीय अधिकारी (तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती) यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ११ सप्टेंबरपर्यंत सादर करावी. संबंधित व्यक्तींनी त्यांचे प्रतिज्ञापत्रात त्यांचा संपुर्ण पत्ता द्यावा, असे आवाहन अमरावतीचे उपविभागीय अधिकारी तथा चौकशी अधिकारी प्रविण ठाकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आज सर्वपक्षीय बैठक
माहुलीवासीयांवर गुन्हे दाखल केल्यासंदर्भात खा. अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी ३ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. अशी माहिती संरपच संजय नागोने यांनी दिली.