वनविभागाच्या तपासणी समितीचा अहवाल रेड्डी, शिवकुमार यांच्या विरोधात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:54+5:302021-05-12T04:13:54+5:30
हरिसाल येथे प्रत्यक्ष भेटींवर भर, गावकऱ्यांशी चर्चा, वनकर्मचाऱ्यांचे नोंदविले बयाण अन् संवाद साधला अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ...
हरिसाल येथे प्रत्यक्ष भेटींवर भर, गावकऱ्यांशी चर्चा, वनकर्मचाऱ्यांचे नोंदविले बयाण अन् संवाद साधला
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वनविभागाने गठित केलेल्या नऊ सदस्यीय तपासणी समितीचा अहवालसुद्धा निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, गुगामलचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या विराेधात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या समितीने एप्रिल महिन्यात हरिसाल, अमरावती येथे भेटी दिल्या, गावकऱ्यांशी चर्चा केली आणि वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यानंतर अहवाल तयार केला आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली चव्हाण मृत्यूप्रकरणी तपासणी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित केली होती. यात पाच आयएफएस अधिकारी, एक आरएफओ, एक एसीएफ, एक सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी, एक स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्य यांचा समावेश आहे. १६ मुद्द्यांवर या समितीला दोन महिन्यात चौकशीअंती निकषाच्या आधारे स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याची डेडलाईन आहे. पोलिसांनी श्रीनिवास रेडडी, शिवकुमार यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांची न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात रवानगी केली. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी रेड्डी यांना अटी-शर्तीच्या आधारे जामीन दिला आहे. रेड्डी यांना नागपूर मुख्यालय न सोडण्याची तंबी उच्च न्यायालयाने दिली आहे. आरोपी विनाेद शिवकुमार याच्या जामिनाबाबत अद्यापही निर्णय नाहीच. मात्र, वनविभागाने गठित केलेल्या तपासणी समितीचा अहवाल तयार झाला असून, अध्यक्ष, सदस्यांच्या एकमताने प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांच्याकडे लवकरच तो सादर केला जाणार आहे. तपासाच्या अनुषंगाने नऊ सदस्यीय समितीने तीन स्वतंत्र पथके तयार केली होती. या तिन्ही पथकांनी त्यांच्या स्तरावर तपास केला. तीनपैकी एका पथकाचे तपासकार्य पूर्ण झाले असून, अहवालदेखील तयार झाला आहे. रेड्डी, शिवकुमार यांच्या विरोधात गावकरी, वनकर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटीनंतर बऱ्याच बाबी तपासणी पथकाच्या निदर्शनास आल्याची माहिती आहे. दोन महिला व एक सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या पथकाने रोखठोक अहवाल तयार केल्याची माहिती आहे.
००००००००००००००००००
वनविभागाची अशी आहे तपासणी समिती
वनविभागाने दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपासणीसाठी नऊ सदस्यांची समिती गठित केली आहे. समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव असून, सहअध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या विभागीय वनअधिकारी पीयूषा जगताप, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विजया कोकाटे, सेवानिवृत्त विभागीय वनअधिकारी किशोर मिश्रीकोटकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण व स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्याचा समितीत समावेश आहे.