माजी सभापतींसह सदस्यांचे बयाण नोंदविले
By admin | Published: August 22, 2015 12:29 AM2015-08-22T00:29:40+5:302015-08-22T00:29:40+5:30
तीन वर्षांपूर्वी महापालिकेत खरेदी करण्यात आलेल्या हायड्रोलिक आॅटो खरेदीत घोटाळा झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह कंत्राटदांरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तत्कालीन स्थायी समितीची चौकशी : हायड्रोलिक आॅटो खरेदी प्रकरण
अमरावती : तीन वर्षांपूर्वी महापालिकेत खरेदी करण्यात आलेल्या हायड्रोलिक आॅटो खरेदीत घोटाळा झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह कंत्राटदांरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या माजी सभापतींसह सदस्यांचे बयाण नोंदविले आहे. आॅटो खरेदीत अपहार झाल्याची तक्रार नगरसेवक प्रदीप बाजड यांनी आयुक्तांकडे केली, हे विशेष.
महापौरांच्या कक्षात सहायक पोलीस निरीक्षक जयराम तावडे यांनी हायड्रोलिक आॅटो खरेदीत झालेली निविदा प्रक्रिया सदस्यांकडून जाणून घेतली. आॅटो खरेदीचा विषय हा प्रशासनाकडून आल्याची माहिती सदस्यांनी पोलिसांना दिली. अधिकाऱ्यांकडून आॅटो खरेदी प्रकरणी बारकावे समजून घेताना काही उणिवादेखील त्यांनी समाजावून घेतल्या. प्रशासकीय पूर्तता पार पडल्यानंतर आॅटो खरेदीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती बहुतांश सदस्यांनी पोलिसांना दिली.
प्रदीप बाजड यांनी पोलीस ठाण्यात दिले बयाण
हॉपर आॅटो खरेदीत अपहार झाल्याप्रकरणी तक्रारकर्ते नगरसेवक प्रदीप बाजड यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात जाऊन बयाण नोंदविले आहे. ज्यावेळी हे आॅटो खरेदी करण्यात आले, त्यावेळी प्रदीप बाजड हे स्वत: स्थायी समितीत सदस्य म्हणून होते. बाजड यांनी पोलिसांना झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. परंतु सन २०१२ मध्ये ४.८९ लाख रुपयांत तर सन २०१५ मध्ये २.९७ लाख रुपयांना आॅटो कसे मिळाले. याच मुद्यावरून आयुक्तांना तक्रार दिल्याचे प्रदीप बाजड ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
महिला सदस्यांचे बयाण नंतर घेणार
आॅटो खरेदीत अपहार झाल्याप्रकरणी तपासाला वेग यावा, यासाठी स्थायी समिती सभापतींसह सदस्यांचे बयाण नोंदविले जात आहे. सन २०१२-२०१३ या वर्षांत स्थायी समितीत असलेल्या चार महिला सदस्यांचेदेखील बयाण नोंदविण्याचे ठरले होते. परंतु हे बयाण नोंदविताना महिला पोलीस घटनास्थळी उपस्थित नसल्याने ममता आवारे, छाया अंबाडकर, नूतन भुजाडे व छाया अंबाडकर या चार महिला सदस्यांचे बयाण नंतर घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रशासकीय विषय आल्यानंतर हॉपर आॅटो खरेदीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. निविदा प्रक्रिया, आयुक्तांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर तो विषय स्थायी समितीने मंजूर केला होता.ई-निविदा प्रक्रिया राबविताना सदस्यांच्या संमतीनेच या आॅटो खरेदीला मंजुरी प्रदान करण्यात आली असून सद्या हे आॅटो व्यवस्थितपणे सुरु आहेत.
- चेतन पवार,
माजी सभापती, स्थायी समिती.
प्रशासकीय मान्यतेअंती आॅटो खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली. तीन निविदा आल्यात. कमी दराच्या निविदाकर्त्याला आॅटो खरेदीचा कंत्राट सोपविला. मात्र आयुक्त गुडेवार यांनी खरेदी केलेल्या आॅटोंच्या तुलनेत त्यावेळी खरेदी करण्यात आलेले हॉपर आॅटो हे दर दुप्पट कसे? त्यामुळे तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे दाखल झाले.
- प्रदीप बाजड,
नगरसेवक तथा तक्रारकर्ते.