आपसी बदल्यांचा प्रस्ताव फेटाळला
By admin | Published: July 13, 2017 12:09 AM2017-07-13T00:09:47+5:302017-07-13T00:09:47+5:30
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील एकूण ३० कर्मचाऱ्यांचा अपवादात्मक परिस्थितीत आपसी बदल्यांचा विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे.
विभागीय आयुक्तांचा निर्णय : झेडपीतील ४४ कर्मचाऱ्यांचा हिरमोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील एकूण ३० कर्मचाऱ्यांचा अपवादात्मक परिस्थितीत आपसी बदल्यांचा विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे. याबाबत ८ जुलै रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी कळविण्यात आले आहे. आयुक्तांच्या निर्णयामुळे इच्छुकांच्या अपेक्षांवर मात्र पाणी फेरले आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरविले आहे. त्यानुसार बदलीप्रक्रिया झेडपी प्रशासनाने नियोजन केलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडलीे. मात्र, आपसी बदल्यांचा निर्णय ३१ मेपर्यंत न झाल्याने झेडपी प्रशासनाने आरोग्यसेवक २, अंगणवाडी पर्यवेक्षिका २, वरिष्ठ सहायक ४, ग्रामसेवक ३०, ग्रामविकास अधिकारी ६ अशा एकूण ४४ आपसी बदल्यांचे प्रस्ताव प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविले होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी हे प्रस्ताव नाकारले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत.