पुरस्कारप्राप्त खेळाडूंची वणवण
By admin | Published: December 2, 2015 12:09 AM2015-12-02T00:09:20+5:302015-12-02T00:09:20+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासोबतच क्रीडा विभागाने शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडुंची उपेक्षा चालविल्याचा प्रकार उघड झाला.
ऐनवेळी मिळाले कापड : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची लेटलतिफी, ३ ला पुरस्कार वितरण
अमरावती : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासोबतच क्रीडा विभागाने शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडुंची उपेक्षा चालविल्याचा प्रकार उघड झाला. पुरस्कार वितरण सोहळा तोंडावर येऊन ठेपला असताना महत्प्रयासाने हा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडुंना वेळेपर्यंत ‘ब्लेझर’ देखील मिळाले नव्हते.
३ डिसेंबरला बालेवाडी, पुणे येथे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडुंचा गौरव होणार आहे. तथापि अमरावतीमधील ज्या महिला खेळाडुंचा तेथे सन्मान होणार आहे त्या समारोहात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले ‘ब्लेझर’चे कापड ऐनवेळी मिळाले. ‘मोनो’ तर अद्यापही न मिळाल्याने ही महिला खेळाडू खिन्न आहे. यवतमाळातील पुरस्कारप्राप्त पुरूष खेळाडूला तर अद्यापही ब्लेझरचे कापड मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही गुणवान खेळाडुंच्या पुण्यातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ३ डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी या दोन्ही खेळाडुंना बुधवारीच अमरावती सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे अमरावतीच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त महिला खेळाडूला मंगळवारी अगदी वेळेवर निमंत्रण पत्रिका देण्यात आली. यावरून खेळाडूंबद्दलची जिल्हा क्रीडा कार्यालयाची अनास्था उघड झाली आहे.
सन २०१३-१४ मधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविणाऱ्या राज्यातील खेळाडुंना ३ डिसेंबरला पुरस्कार वितरित केले जातील. अमरावतीची आट्यापाट्या खेळाडू वृषाली गुल्हाने आणि यवतमाळचा आकाश नांदुरकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या समारंभात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पोषाखात म्हणजे ‘ब्लेझर’ परिधान करून उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या खेळाडूंना ब्लेझरवर लावण्यासाठी ‘मोनो’ सुध्दा पुरविण्यात येतो. गुणवान खेळाडू उपस्थितांच्या ठळकपणे नजरेत भरावेत, यासाठी शासन ही सोय करते. मात्र, स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला मात्र याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
पुरस्कार वितरण समारोह अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना अमरावतीच्या वृषाली गुल्हाने हिला सोमवारी रात्री जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ‘ब्लेझर’चे कापड पुरविण्यात आले. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात ‘ब्लेझर’ शिवून घेण्याची कसरत वृषालीला करावी लागली.