राज्यात कारागृह अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नतीचे प्रस्ताव मागितले
By गणेश वासनिक | Published: March 4, 2023 06:35 PM2023-03-04T18:35:04+5:302023-03-04T18:36:10+5:30
अपर पोलिस महासंचालकांचे निर्देश; मुंबई, पुण्याकडील अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी
अमरावती : राज्याच्या कारागृहांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे नव्याने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गत काही महिन्यांपासून रखडलेली बदली, पदाेन्नतीची प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली असून, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे वास्तव आहे. रिक्त पदांची संख्या प्रसिद्ध करण्याबाबतचे परिपत्रक २ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे.
राज्यातील कारागृहे कैद्यांच्या गर्दीने ओव्हरफ्लो झाली आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. एकट्या
विदर्भातील कारागृहात ६० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे डीआयजी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांची बदली करताना पदोन्नतीचा विचार केला आहे. पूर्व विभाग नागपूर, पश्चिम विभाग पुणे, मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर, दक्षिण विभाग मुंबई आणि पुणे मुख्यालयातील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यात रिक्त पदांसह बदली, पदोन्नतीची आकडेवारी पाठवावी लागणार आहे. कारागृह उपमहानिरीक्षक ते लिपिक, हवालदार, परिचारक अशी ७७० पदे रिक्त असल्याची माहिती हाती आली आहे.
मुंबई, पुण्यात ठाण मांडून बसलेल्यांची खैर नाही
मुंबई, पुण्याकडे कारागृहांमध्ये वर्षानुवर्षे मलईदार पदावर कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. मात्र, पदोन्नती हवी, पण विदर्भात नको, अशी या अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे पदोन्नतीची यादी रखडत आहे. पदोन्नतीसाठी काही पात्र अधिकारी असताना त्यांची जुने प्रकरण बाहेर काढण्याची शक्कलदेखील लढवली जात आहे. मात्र, आता मुंबई, पुण्यात गत काही वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली जाणार आहे. तसे निर्देश डीआयजी गुप्ता यांनी दिल्याची माहिती आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"