प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्याही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:13+5:30
विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७६ अर्ज हे अवघड क्षेत्रातील आहेत. संवर्ग २ मध्ये सहायक शिक्षकांचे ९२ अर्ज आले आहेत. त्यापैकी ६३ अवघड क्षेत्रातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांची प्रक्रियाही रद्द करण्याचा निर्णय ८ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यासंबंधी पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना प्रशासनाने पाठविले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत विनंती बदल्या समुपदेशनाद्वारे घेण्याचे सुचविले होते. अशातच प्रशासकीय बदल्या न करता विनंती बदल्या कराव्यात, अशा सूचना धडकल्या. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक संवर्गातील अवघड क्षेत्रात मुख्याध्यापकांची ४७ पदे रिक्त आहेत. विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७६ अर्ज हे अवघड क्षेत्रातील आहेत. संवर्ग २ मध्ये सहायक शिक्षकांचे ९२ अर्ज आले आहेत. त्यापैकी ६३ अवघड क्षेत्रातील आहेत. संवर्ग-१ आणि २ मध्ये प्राप्त झालेले विनंती अर्ज जास्तीत जास्त अवघड क्षेत्रातील आहेत. यामधील बहुतांश शिक्षकांची विनंती ही सर्वसाधारण क्षेत्रासाठीच आहेत. सर्वसाधारण क्षेत्रात सर्व संवर्ग मिळून १४६ पदे रिक्त आहेत.यामधील १०० पदे ही न्यायप्रविष्ट आहेत. आजचे विद्यार्थी पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करता केवळ विनंती बदल्या केल्यास अवघड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे यावर्षी शिक्षक बदल्या न करण्याचा निर्णय घेतल्याचे मु्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
विनंती बदल्यांमध्ये सर्वाधिक अर्ज अवघड क्षेत्रातील आहेत. तेथील अनुशेष लक्षात घेऊन व अध्यक्ष, शिक्षण सभापती यांच्याशी चर्चा करू न हा निर्णय घेतला आहे.
- अमोल येडगे
मुख्य कार्यकारी अधिकारी