5 हजार वर्षे जुन्या सिंधू सभ्यतेवर संशोधन, जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्स रिपोर्टमध्ये महाराष्ट्रीयांचे संशोधन प्रकाशित
By गणेश वासनिक | Published: March 19, 2024 08:52 PM2024-03-19T20:52:03+5:302024-03-19T20:52:31+5:30
मानवी संस्कृतीची उत्पत्ती आणि प्रसारावर भर
अमरावती: मानवी संस्कृतीची उत्पत्ती आणि प्रसार समजून घेण्यासाठी सिंधू खोरे हे सर्वात जुन्या व अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. शिकार आणि अन्न गोळा करण्याच्या टप्प्यावर हजारो वर्षे घालविल्यानंतर मनुष्य केवळ १० हजार वर्षांपूर्वीच शेतीप्रधान झाला. भारतीय उपखंडाच्या वायव्येस सिंधू सभ्यतेची ठिकाणे विस्तीर्ण आहेत. अलीकडच्या काळात हरियाणा राज्यातील भिराना हे गाव एक महत्त्वाचे सिंधू सभ्यतेचे अभ्यास केंद्र म्हणून उद्यास आले. या ठिकाणी सात हजार वर्षांपूर्वीची हडप्पा सभ्यतापूर्व वसाहत म्हणून वर्गीकृत आहे.
अलीकडेच महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांनी एल्सेवियर प्रकाशनाच्या ‘जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्सः रिपोर्ट’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये पाच हजार वर्षे जुन्या सिंधू खोऱ्याशी संबंधित संशोधन प्रकाशित केले. या संशोधनात अमरावती येथील शासकीय ज्ञान-विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ.मुमताज बेग सहभागी आहेत. ते सध्या कॅनडामध्ये संशोधन करीत आहेत. तथा यवतमाळ येथील अमलोकचंद महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.अश्विन अतकुलवार, डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजी (पुणे) येथील प्रा.डॉ.आरती देशपांडे-मुखर्जी यांच्यासोबत सहकार्य करून संशोधन केले.
प्रा.डॉ.आरती देशपांडे-मुखर्जी यांनी भिराना स्थळावरील विविध ठिकाणांहून प्राण्यांची हाडे उत्खनन करून प्राप्त केली. हाडांचा आकारशास्त्रीय आधारित अभ्यास केल्यानंतर लॅबोरेटरी ऑफ मॉलीकूलर ॲन्ड कॉन्जर्वेशन जेनेटिक, अमरावती शासकीय ज्ञान विज्ञान संस्थांच्या प्रयोगशाळेत डीएनए आधारित अभ्यासासाठी हाडे पाठविण्यात आली होती. पुरातत्त्वीय स्थळाच्या उत्खननादरम्यान भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे हाडांच्या छोट्या तुकड्यांवरून प्राणी ओळखणे. डॉ.बेग आणि डॉ.अतकुलवार यांनी तीन हजार वर्षांहून अधिक जुन्या गुरांचा हाडांमधून डीएनए मिळविण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी डीएनए मार्कर व नवीन जनुकीय प्रोटोकॉल तयार केले. हजारो वर्षांच्या हाडांमधून डीएनए काढण्यात जगातील फार कमीच संशोधक यशस्वी झाले आहेत.
शोधनिबंधांच्या प्रकाशनानंतर जगाच्या विविध भागांतील संशोधकांनी या शोधनिबंधाच्या प्रतींची मागणी केली आहे. विज्ञानाच्या अभ्यासाला खूप संयम आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. हा शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी थेट ६ वर्षांचा कालावधी लागला.- डॉ.मुमताज बेग, संशोधन चमू प्रमुख