आठ विद्यापीठांकडे वनवणवा संशोधनाची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:06 PM2019-03-01T12:06:09+5:302019-03-01T12:08:10+5:30
दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली. या हंगामातील वनवणवा नियंत्रणासाठी या संशोधनाचा उपयोग व्हावा, यादृष्टीने त्यासाठीचा निधी वितरित करण्यात येणार आहे. एकूण आठ विषयांवर हे संशोधन होत असून, प्रतिविषय दोन लाखांचा निधी दिला जाणार आहे.
१५ फेब्रुवारी ते १५ जून असा वनवणवा कालावधी गृहीत धरला जातो. वणवा रोखण्यासाठी विद्यापीठांच्या संशोधनातून उपलब्ध होणारे उपाय प्रभावी ठरू शकले, तर त्याचा मोठा लाभ निसर्गसाखळी अबाधित राखण्यास होऊ शकेल. या संशोधनकार्यात सहभागी असलेली राज्यातील विद्यापीठे अशी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ (लोणेरे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), शिवाजी विद्यापीठ, (कोल्हापूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (अमरावती), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ (नागपूर), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली).
यंदाच्या १५ फेब्रुवारीपासून संशोधनाला प्रारंभ झाला आहे. एका संशोधन चमूत दोन प्राध्यापक आणि पाच विद्यार्थी आहेत. जंगलात जाऊन वनवणव्यासंदर्भात ही चमू अभ्यास करणार आहे. १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत संशोधनाचा वस्तुनिष्ठ अहवाल वनमंत्रालयाकडे सादर करावा लागेल. शासनाने वनवणवा संशोधन व सर्वेक्षणासाठी निधीला मान्यता दिली आहे.
जंगल आणि वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांचे संरक्षण, संवर्धनाची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. संशोधन, सर्वेक्षणातून पुढे आलेल्या उपाययोजना तात्काळ लागू केल्या जातील.
- हरिश्चंद्र वाघमोडे,
विभागीय वनाधिकारी, अमरावती.
या विषयावर होणार संशोधन, सर्वेक्षण
- वनवणवा प्रतिबंधक व व्यवस्थापनासाठी वने, स्थळांच्या विशेष माहितीचे ज्ञान संपादन
- १५ फे ब्रुवारी ते १५ जून २०१९ असा वन वणवा कालावधीचा अभ्यास
- फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडिया या सॅटेलाइटवर अधिकारी, वनकर्मचाऱ्यांचे मोबाइल नोंदणी
- डिसेंबर २०१८ मध्ये झालेली जंगलक्षेत्र फायर लाइन कटाई
- १५ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचे जाळरेषा कामांची वस्तुस्थिती
- संयुक्त वनव्यवस्थापन समितीला प्रोत्साहनपर बक्षीस योजना
- वनकर्मचारी अहवालात चेकलिस्ट, मार्गदर्शक तत्त्वे
- जंगल क्षेत्राचे फायर आॅडिट