संशोधकांकडून मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:14+5:302021-04-30T04:16:14+5:30
अखेर संशोधकांनी केली मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी नमुने तापासणीकरिता रवाना : कृषी विभागाने घेतली दखल मोर्शी : ...
अखेर संशोधकांनी केली मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी
नमुने तापासणीकरिता रवाना : कृषी विभागाने घेतली दखल
मोर्शी : मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागेतील आंबिया बहराला गळती लागली असताना संत्रा झाडांची पाने पिवळी पडून गळत आहेत. सोबतच संत्राझाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. तालुक्यातील घोडदेव, पाळा, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, भाईपूर, बेलोणा, अंबाडा या भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहराला फटका बसला आहे. त्याअनुषंगाने संशोधक येथील संत्राबागेत पाहणीकरिता पोहोचले.
तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्रातील के. पी. सिंग, विशेष तज्ज्ञ पीक संरक्षक प्रज्ल्लल महल्ले यांनी दापोरी, डोंगरयावली घोडदेव परिसरातील रुपेश वाळके, विजय विघे, मनीष गुडधे यांच्या संत्राबागांना भेटी देऊन संत्राफळ डिंक्या रोग, संत्रा पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी पर्यवेक्षक मोहन फुले, कृषी सहायक दिनेश चौधरी, किशोर राऊत, विनोद बोण्डे, अवंतिका कोल्हे, शेतकरी विजय विघे, मनीष गुडधे, कांचन कुकडे, देविदास विघे, दिनेश वाळके उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञांनी मोर्शी तालुक्यातील संत्राबागांची पाहणी करून अज्ञात रोगाचे नमुने तपासणीकरिता पाठविले. त्याबाबत योग्य मार्गदर्शन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड यांनी सांगितले.