ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या
By प्रदीप भाकरे | Published: July 6, 2023 01:13 PM2023-07-06T13:13:22+5:302023-07-06T13:14:57+5:30
ठाणेदारांची अदलाबदल : नव्या चेहऱ्यांना संधी
अमरावती : पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ५ जुलै रोजी घटकातील ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पारित केले. यात अनेक ठाणेदारांची अदलाबदली करण्यात आली आहे.
यात नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक अजय अहिरकर यांना सायबर पोलीस ठाण्याची ठाणेदारकी देण्यात आली आहे. तर सतीश पाटील हे चांदूररेल्वेचे नवे ठाणेदार असतील. शिरखेड येथे कार्यरत सहायक पोलीस निरिक्षक हेमंत कडुकार यांची अनैतिक मानवी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर चांदुररेल्वेचे ठाणेदार पंकज दाभाडे हे मंगरूळ दस्तगीरचे नवे ठाणदेार असतील. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे यांच्याकडे तळेगाव दशासरची ठाणेदारकी देण्यात आली आहे. इश्वर वर्गे खोलापुरचे ठाणेदार झाले आहेत. तर सहायक पोलीस निरिक्षक सुलभा राऊत यांची अंजनगाव सुर्जी तर संघरक्षक भगत यांची वरूड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतील सचिन पवार व सायबरमधील निर्मला भोई यांना जुन्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरिक्षक प्रमोद काळे यांची चांदूरररेल्वेहून नांदगाव, गणेश सपकाळ तिवसा, तर संजय शिंदे व नितीन चुलपार यांना स्थानिक गुन्हे शाखेत कायम ठेवण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यातील कालावधी पुर्ण झाल्याने बदली
पोलीस ठाण्यातील कालावधी पुर्ण झाल्याने सात सहायक पोलीस निरिक्षक व आठ पोलीस उपनिरिक्षकांची बदली करण्यात आली. सहायक पोलीस निरिक्षक शितल निमजे चिखलदराहून वरूड, नरेंद्र पेंदोर चांदूरबाजारहून परतवाडा, किरण औटे दर्यापुरातून सरमसपुरा ठाणेदार, सारिका राऊत वरूडहून चांदरबाजार, शुभांगी थोरात शेंदुरजनाघाटहून मोर्शी, प्रियंका चौधरी दत्तापुरातून चांदूररेल्वे व वरूडमध्ये कार्यरत वैभव महांगरे यांची बदली पैरवी शाखेत करण्यात आली आहे.