देशी कट्टा विक्री करणारा अटकेत
By admin | Published: November 26, 2015 12:11 AM2015-11-26T00:11:42+5:302015-11-26T00:11:42+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून देशी कट्ट्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मंगळवारी रात्री खुर्शिदपुऱ्यातून अटक केली.
अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून देशी कट्ट्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मंगळवारी रात्री खुर्शिदपुऱ्यातून अटक केली. सोहेल खाँ (खुर्शिदपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपासाकरिता हे प्रकरण नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
खुर्शीदपुऱ्याच्या मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ देशी कट्ट्याचा व्यवहार करण्यासाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय गोपाल उपाध्याय, संजय बाळापुरे, संतोष शिखरे, प्रमोद खरबडे, जुनेद, दीपक दुबे, दीपक खाणीवाले, पंकज यादव, सुधीर गुडधे यांच्या पथकाने खुर्शिदपुऱ्यातील मैदानात सापळा रचला. दरम्यान रात्रीच्या सुमारास आरोपी सोहेल खाँ तेथे आला असता पोलिसांनी त्याला पकडले. झडती घेतली असता एक देशी कट्टा मिळून आला. आरोपीने २५ हजारात देशी कट्ट्याचा व्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच हा देशी कट्टा एका ट्रकवाल्याने दिल्याची कबुली पोलिसांनी दिली. पोलिसांनी तो कट्टा जप्त केला आहे. देशी कट्टयाचा व्यवहार हा पहिल्यांदा ट्रान्सपोर्टनगरात होणार होता.