प्रवासी निवारा बनला जनावरांचे आश्रयस्थान !
By admin | Published: January 6, 2016 12:13 AM2016-01-06T00:13:39+5:302016-01-06T00:13:39+5:30
येथील प्रवासी निवाऱ्याला भगदाड पडले आहे. टिनसुध्दा फाटलेले आहे. यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांना बचाव करता येत नाही.
परिवहन विभागाचे दुर्लक्ष : निवाऱ्याचे अद्यापही नूतनीकरण नाही
पुसला : येथील प्रवासी निवाऱ्याला भगदाड पडले आहे. टिनसुध्दा फाटलेले आहे. यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांना बचाव करता येत नाही. अनेक वेळा मागणी करुनही प्रवासी निवारा झाला नाही. कुत्रे आणि गाढवांचे निवासस्थान झाले आहे, याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.
पुसला गावामध्ये १५ हजार लोकसंख्या असून या गावासोबत अनेक आदिवासी खेड्यांचा संपर्कआहे. नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर येथे वर्दळ असते. राज्य महामार्गावरील गाव आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील प्रवाशांचा संपर्क असतो. येथे अनेक वर्षांपूर्वी बांधलेला राज्य परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा आहे. प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असून भिंतीला भगदाड तसेच टिनाची छपरे फाटलेली असून ऊन, वारा, आणि पावसापासून प्रवाशांचे सरंक्षण होऊ शकत नाही. उलट कुत्रे आणि गाढवांचा मुक्त संचार येथे असतो.
प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही येथे प्रवासी निवाऱ्याचे नूतनीकरण झाले नाही किंवा स्थानिक विकास निधीतून लोकप्रतिनिधीने येथे प्रवासी निवारा बांधला नाही. या गावात अनेक पक्षांचे नेते उदयास आले आहेत. परंतु एकाही नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला प्रवासी निवाऱ्याची आवश्यकता भासली नाही. पावसाळा, उन्हाळा व हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवाशांना बाहेर उघड्यावर बसेसची वाट बघावी लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)