जिल्हावासीयांनी रिचवले साडेतीन कोटींचे मद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:37 PM2019-01-01T21:37:09+5:302019-01-01T21:37:57+5:30
सोमवारी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष जिल्हाभर साजरा करण्यात आला. यामध्ये मद्यशौकीनही मागे नव्हते. मद्यशौकिनांनी ‘थर्टी फर्स्ट’ची संधी साधून या एका दिवसाला सरासरी साडेतीन कोटींचे मद्य रिचवले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळाली आहे. नियमित व्यवसायपेक्षा सोमवारी ६० टक्के अधिक व्यवसाय झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोमवारी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष जिल्हाभर साजरा करण्यात आला. यामध्ये मद्यशौकीनही मागे नव्हते. मद्यशौकिनांनी ‘थर्टी फर्स्ट’ची संधी साधून या एका दिवसाला सरासरी साडेतीन कोटींचे मद्य रिचवले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळाली आहे. नियमित व्यवसायपेक्षा सोमवारी ६० टक्के अधिक व्यवसाय झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात ३३ वाइन शॉपी, २०७ वाइन बार, २२ बीअर शॉपी अधिकृतरीत्या असल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. गेल्या आठवड्याभरापासून बोचऱ्या थंडीने जोर पकडला आहे. रात्रीच्या तापमानातही प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे मद्यपींनी वाइनला पसंती दर्शविली होती. एका वाइन शॉपीतून ‘थर्टी फर्स्ट’ला सरासरी चार लाखांची दारूविक्री झाली. त्यानुसार वाइन शॉपीचालकांचा १ कोटी ३२ लाखांचा व्यवसाय झाला. प्रत्येक वाइन बारमध्ये सरासरी एक लाखांची रुपयांची दारू विक्री झाली. जिल्ह्यात २०७ वाइन बार आहेत. म्हणजे २ कोटी ७० हजारांचा व्यवसाय झाल्याची माहिती आहे. बीअर शॉपीमध्ये सरासरी २५ हजारांची विक्री झाली. म्हणजे २२ बीअर शॉपीमध्ये ५ लाख ५० हजारांची बीअर सरासरी विकल्या गेली. देशीदारू वगळ्ता इतर दारुची जिल्ह्यात ३ कोटी ३८ लाख २० हजारांची दारू अमरावतीकर मद्यशौकिनांनी ‘थर्टी फर्स्ट’ची संधी साधून रिचवली.
२५ ठिकाणी कारवाई, २० आरोपींना घेतले ताब्यात
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० व ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्याभरात २५ ठिकाणी केलेल्या कारवाईत २५ जणांना ताब्यात घेतले.
३० डिसेंबर रोजीच्या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३४५ लिटर हातभट्टीची दारू, ४४ लिटर देशी दारू तसेच १३०० लिटर मोहाचा सडवा जप्त केला. ‘थर्टी फर्स्ट’ला सात ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये सात जणांना ताब्यात घेतले आहे.
फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत
सोमवारी रात्री १२ वाजता नववर्ष २०१९ चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले. शहरातही ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताला एकच जल्लोष करण्यात आला.
कारवाईसाठी आठ भरारी पथके
अवैध दारूविक्री रोखण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. उत्पादन शुल्क निरीक्षक व दुय्यम निरीक्षक दर्जाचे अधिकारी, शिपाई यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला होता.