डॉक्टरांचे राजीनामे; बालरोग विभाग बंद

By admin | Published: July 13, 2017 12:06 AM2017-07-13T00:06:42+5:302017-07-13T00:06:42+5:30

२९ मे च्या मध्यरात्री डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी)च्या एनआयसीयूमध्ये एकापाठोपाठ एक चार शिशुंचा चुकीच्या औषधोपचारामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेकांवर.....

Resignation of doctors; Closure of pediatric department | डॉक्टरांचे राजीनामे; बालरोग विभाग बंद

डॉक्टरांचे राजीनामे; बालरोग विभाग बंद

Next

कारवाईची तलवार : पीडीएमसीतील शिशूमृत्युप्रकरणाचा धसका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : २९ मे च्या मध्यरात्री डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी)च्या एनआयसीयूमध्ये एकापाठोपाठ एक चार शिशुंचा चुकीच्या औषधोपचारामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेकांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे येथील बालरोेग विभागात कार्यरत तब्बल सहा डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने येथील बालरोग विभाग बंद झाल्यात जमा असून विभागाला टाळे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शिशू मृत्युप्रकरणात दोषी आढळलेले निवासी डॉक्टर भूषण कट्टा यांना अटक झाली. परिचारिकेलाही पोलिसांनी ताब्यात घेतला. पीडीएमसी प्रशासनाने सुद्धा कट्टा यांना बडतर्फ केले आहे. बालरोगतज्ज्ञ राजेंद्र निस्ताने यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणाचा प्रचंड धसका घेऊन इतर बालरोेगतज्ज्ञांनी राजीनामे दिल्याने पीडीएमसीच्या एनआयसीयूवर टाळे लावण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील एका मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग बंद झाल्याच्या याघटनेचे अनेक अन्वयार्थ काढले जात आहेत. मेडिकल कॉलेजचा एक विभाग डॉक्टरांअभावी बंद होण्याची ही बाब अतिशय गंभीर आहे. पीडीएमसीमध्ये शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. बालरोग विभागात ३०-३० खाटांचे दोन युनिट आहेत. प्रत्येक युनिटमध्ये आठ बालरोगतज्ज्ञ नियुक्त होते. येथील एनआयसीयू व पीआयसीयूमध्ये प्रत्येकी आठ डॉक्टरांची नियुक्ती असते. मात्र, डॉक्टरच नसल्याने संपूर्ण बालरोग विभागासह एनआयसीयू व पीआयसीयूला देखील कुलूप लागले आहे. शिशूमृत्युप्रकरणात कारवाईचा धसका घेऊन डॉक्टर येथे काम करण्यास तयार नाहीत. जवळपास सर्वच डॉक्टरांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. परिणामी रूग्णांना अन्य ठिकाणी रेफर करण्याची वेळ आली आहे. बालरोग विभागातील ऋषिकेश घाटोळ, कौस्तुभ देशमुख यांनी यापूर्वीच राजीनामे दिले असून आता पंकज बारब्दे, श्रीपाद जहांगिरदार, प्रतिभा काळे आणि अन्य एका बालरोगतज्ज्ञाने राजीनामा दिला आहे.

शासनाने घ्यावी दखल
प्रचंड मोठा व्याप असलेल्या पीडीएमसीतील बालरोग विभाग बंद पडणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणाची आरोग्य विद्यापीठ, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियासह राज्य शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

अधिष्ठाता पदाचा वाद कायमच
पीडीएमसीचे अधिष्ठाता म्हणून तुर्तास कार्यरत दिलीप जाणे यांच्या पदाचा वाद मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे अनेकदा नोटीस बजावूनही ते पदावर कायम आहेत. विद्यापीठात त्यांच्या समतुल्य १५ प्रोफेसर्स असूनही जाणेंना पदाचा एवढा सोस का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. डॉ. पद्माकर सोमवंशींना हायकोर्टाने क्लिनचिट दिली असून पदावर रुजू करून देण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ. जाणेंना पाठीशी घातले जात असल्याने हा तिढा कायमच आहे.

बालरोग विभागात कार्यरत ६ डॉक्टरांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. कारवाईच्या भीतीपोटी येथे सेवा देण्यास डॉक्टर तयार नाहीत. त्यामुळे हा विभाग बंद पडला आहे. उपचारार्थ येणाऱ्या रूग्णांना इतरत्र हलविले जात आहे.
-दिलीप जाणे,
डीन, पीडीएमसी,

Web Title: Resignation of doctors; Closure of pediatric department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.