अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:17+5:302021-04-19T04:12:17+5:30

अमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. ...

Resist injustice in time, strongly support the government | अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे पाठीशी

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे पाठीशी

Next

अमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिलाभगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिली.

मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी , वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक अविनाशकुमार, नवलकिशोर रेड्डी, पीयुषा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री, चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली.

महिला वनकर्मचाऱ्यांशी बोलताना अवमानजनक भाषेचा वापर होणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देणे, कॅम्पवर स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, मानसिक छळ, विशेष व्याघ्र संरक्षक दलातील वनकर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे, अशा गंभीर तक्रारी या भगिनींकडून होत आहेत. वन प्रशासनाने त्यांची तत्काळ दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी वन प्रशासनाला दिले.

बॉक्स

विशाखा समितीचे कार्य योग्यरीत्या चालवा

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरीत्या चालणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिले. महिला वनकर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचना त्यांनी केली.

बॉक्स

अडचण असल्यास थेट संपर्क साधा

कुठलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. फेसबुक पेजवर मोबाइल नंबर जाहीर केला आहे. तसेच व्हाॅट‌्सॲपवर संदेशही पाठवता येईल. निर्भिडपणे आपली समस्या मांडा. विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे महिला वनकर्मचाऱ्यांनाही मिळावी व इतरही समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा दिलासा त्यांनी दिला.

Web Title: Resist injustice in time, strongly support the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.