कुपोषणमुक्तीचा संकल्प, विकासकामांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:23 PM2018-01-03T23:23:42+5:302018-01-03T23:24:36+5:30
प्र्रभावी संपर्क यंत्रणा, डेडिकेटेड टीमवर्कद्वारे यंदा मेळघाटमधील कुपोषण निर्मूलनाचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्र्रभावी संपर्क यंत्रणा, डेडिकेटेड टीमवर्कद्वारे यंदा मेळघाटमधील कुपोषण निर्मूलनाचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे. यासह जिल्ह्यात जनकल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्षभऱ्यात नियोजित कामांचे प्रारूप तयार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.
मेळघाटात भक्कम आरोग्य यंत्रणेसह विविध विकासकामांची भरीव अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे, कृषी पंप वीज जोडणी, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहिरी, मागेल त्याला शेततळे, आवास योजनांसह यंदाच्या वर्षात प्रशासनाकडून होणाºया नव्या कामांची आखणी व गतवर्षी झालेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकाºयांनी घेतला. मेळघाटातील दिया येथील सिपना नदीवरील सौर ऊर्जाधारित उपसा सिंचन योजना व चिखलदरा-धारणीत दुध उत्पादनासाठीचे क्लस्टर अशा विविध कामांमुळे रोजगार निर्मितीसह अपारंपरिक ऊर्जा निमितीला गती देण्याचा प्रयत्न आहे. दुग्ध उत्पादन व त्यातून रोजगारनिर्मितीचे मदर डेअरीचे सहकार्य मिळाले आहे. त्याला जोडूनच वॉटर कपअंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती नुकतीच करण्यात आली. मेळघाटात प्रथम श्रेणी डॉक्टरांसह विशेष तज्ज्ञही नेमण्याचे नियोजन आहे. मेघाटात कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामपातळीवरील विविध अधिकारी, कर्मचाºयांचा समन्वय, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती यासह स्वयंसेवी संस्था व इतर संस्थांचे सहकार्य मिळविण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत ८५ हजारांवर शेतकºयांना लाभ मिळाला. जिल्ह्यात रेमण्डसारखा भव्य प्रकल्प सुरू झाला. वस्त्रोद्योग पार्कसह इतरही विविध उद्योगांना चालना देऊन तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.
कृषी संजीवनीमुळे विकासाला गती
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १८०० शेततळे पूर्ण झाले आहेत. या कामाला गती देण्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत खारपाणपट्ट्यात २७ गावांतील २४६ काम सुरू आहेत. सद्यस्थितीत ३,६०० कामे पूर्णत्वास गेली आहेत. खारपाणपट्ट्यावर लक्ष केंद्रित करून तिथे शेततळ्यांचे अधिक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. यासह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे विकास प्रक्रियेला गती मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.