६५ ग्रामपंचायती पाठविणार राज्य शासनाला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:18+5:302021-08-29T04:15:18+5:30
ड यादी चा मुद्दा गाजला सरपंचांच्या सभेत ‘ड’ यादीचा मुद्दा गाजला, गरजूंना तात्काळ घरकुल देण्याची मागणी धामणगाव रेल्वे : ...
ड यादी चा मुद्दा गाजला
सरपंचांच्या सभेत ‘ड’ यादीचा मुद्दा गाजला, गरजूंना तात्काळ घरकुल देण्याची मागणी
धामणगाव रेल्वे : सन २०११ च्या लोकसंख्या सर्वेक्षणाच्या घरातील भौतिक साधनांच्या नोंदीवरून ‘ड’ यादीतील दोन हजार घरकुल रद्द करण्यात आली. ‘लोकमत’ने याबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत सरपंचांच्या सभेत ‘ड’ यादीचा मुद्दा गाजला. तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती ग्रामसभेत गरजूंना घरकुल उपलब्ध करण्याबाबत ठराव घेऊन राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याला पाठविले जाणार आहेत.
घरी टीव्ही, फ्रिज, दुचाकी, चारचाकी, शेती असल्याची माहिती सन २०११ च्या जनगणनेच्या वेळी घेण्यात आली. त्याआधारे तालुक्यातील दोन हजार घरकुले रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील सर्व सरपंचांची सभा पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, राजकुमार केला, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे, विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले यांची उपस्थिती होती. ‘ड’ यादीतील गरजूंची नावे अशाप्रकारे रद्द होणे अन्याय् बाब असल्याचे मत या सरपंचांनी व्यक्त केले. ‘ब’ यादी अद्यापही पूर्ण झाली नाही. अनेकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, असे मुद्देही या बैठकीत मांडण्यात आले. आगामी काळात सर्व ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन हा ‘ड’ यादीतील नावे रद्द करू नये, असा ठराव राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याला पाठविण्याचे एकमताने या बैठकीत ठरविण्यात आले. तालुक्यातील अनेक सरपंचांनी गावाच्या समस्येचा मुद्दा या बैठकीत मांडला.
हिंगणगाव, मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत आयएसओ दर्जा मिळाल्याने इतर ग्रामपंचायतींनीही पुढाकार घ्यावा. कर वसूल करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी केले. गावांच्या विकासासाठी कृती समिती तयार करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. संचालन विशाल सुटे व आभार प्रदर्शन जळगावचे सरपंच मनोज शिवनकर यांनी केले.