‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 05:51 PM2019-07-22T17:51:16+5:302019-07-22T18:42:26+5:30
राज्यभरात ६० बाह्य रुग्णालयांना कंत्राट : झोपडपट्टी भागासाठी सुविधा
अमरावती : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सन २०१९-२० मध्ये अमरावती जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चालविण्यात येणार आहे. बाह्य संस्थांद्वारे ही क्लिनिक्स चालविली जातील. त्या बाह्यसंस्था निश्चित करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया होणार आहे. राज्यात असे एकूण ६० दवाखाने असून, विदर्भात १३ दवाखाने असतील.
महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागातील नागरी सुविधांपासून दूर असलेल्या क्षेत्रांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वार्षिक ३०१.५० लाख रुपये किमतीचा हा प्रकल्प आहे. ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना/क्लिनिक’ या प्रकल्पासंबंधी प्रस्तावास मुंबई स्थित राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक तथा आयुक्त (आरोग्य सेवा) यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्तावाच्या अनुषंगाने १५७.५० लाखांच्या खरेदीस मान्यता दिली आहे. त्यानुसार मुंबईत सर्वाधिक ११, ठाणे १०, नाशिक ६, लातूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, चंद्रपूर व उल्हासनगर येथे प्रत्येकी ५, मिरा भार्इंदर व अमरावती प्रत्येकी ३, तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात दोन क्लिनिक उघडले जाणार आहेत. सुत्रांनुसार, प्रत्येक दवाखान्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता २.२५ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. रुग्णतपासणीचे प्रत्येकी ३० रुपये मिळतील. दरदिवशी ७० रुग्ण याप्रमाणे महिन्यातील २५ दिवस यानुसार सहा महिन्यांकरिता ही रक्कम असेल. ६० दवाखान्यांची एकत्रित रक्कम १३५ लाख रुपये होते. याशिवाय प्रत्येक दवाखान्यामध्ये टॅब, क्लाऊड आधारित सॉफ्टवेअर, सर्व्हर, प्रिंटर आदीकरिता राज्यस्तरावरून प्रणाली कार्यान्वयनाकरिता प्रतिदवाखाना ३७ हजार ५०० रुपये मंजूर आहेत. दरमहा १२५० रुग्णांकरिता प्रत्येकी पाच रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी ही रक्कम असेल. ही एकत्रित रक्कम २२.५० लाख रुपये होत आहे.
दिल्लीच्या धर्तीवर दवाखाने
दिल्ली येथील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर ही ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ साकारले जाणार आहेत. शहरातील नागरिकांना विशेषत: झोपडपट्टीमधील रहिवाशांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी हा प्रकल्प साकारला जात आहे.