वन्यजीव छायचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:44 PM2018-08-01T22:44:29+5:302018-08-01T22:45:01+5:30
अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील कलादालनात आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्याला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील कलादालनात आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्याला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अॅनिमेशन कॉलेजचे संचालक आणि बॉम्बे आर्ट गॅलरीचे माजी अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप यांनी केले. सोहळ्याला संघटनेचे सल्लागार जयंत दलाल, रामेश्वर गुल्हाने, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक एम.एस. रेड्डी, किरण पातूरकर, नागपूर येथील सुप्रसिद्ध छायाचित्रकार शेखर सोनी यांनी सदिच्छा भेट दिली. राहुल गुप्ता, मनोज बिंड, अभिमन्यू आराध्य, मीनाक्षी राजपूत, मनीष तसरे, प्रवीण दौंड यांनी परिश्रम घेतले.
दूरदूष्टी हाच छायाचित्रणाचा पाया
उत्कृष्ट छायाचित्रणासाठी दूरदृष्टीचा पाया मजबूत असावा लागतो. दहा लाख लोकसंख्येच्या शहरात एवढे छायाचित्रकार ही अभिमानाची बाब आहे. लग्नाचे फोटो, एखादा प्रसंग कैद करताना काय टिपणार, हे छायाचित्रकाराच्या मनात असते. मात्र, वन्यजीव छायाचित्रण ही वेगळी अनुभूती आहे. समोर श्वापदांच्या रूपात प्रत्यक्षात मृत्यू डोळ्यांसमोर ठेवून छायाचित्रण करणे ही साधी बाब नाहीच. आपल्या या कलेला योग्य स्थान मिळावे, यासाठी आमच्या स्वागतासाठी वाजविलेला ढोलताशा आयुक्तांच्या घरासमोर वाजविण्याची गरज आहे. आपले कलादालन उत्कृष्ट व्हावे यासाठी आंदोलनाची गरज आहे, असे विजय राऊत याप्रसंगी म्हणाले.
लेखकांपेक्षा छायाचित्रकारांना येणार महत्त्व
खरे तर वन्यजीव छायाचित्रण हा माझा छंद असला तरी मला इतरांनी काढलेले छायाचित्रे पाहायला फार आवडते. वन्यजीव छायाचित्रांचे महत्त्व आता वाढीस लागले आहे. हजार शब्दांचे काम एक छायाचित्र करीत असते. यामुळे लेखकांपेक्षा छायाचित्रकारांचे दिवस येणाऱ्या काळात उत्तम असणार असून, त्यांचे महत्त्व वाढणार आहे. पुढच्या काळात मेळघाटात जाऊन मी फोटोग्राफीचा वर्कशॉप घेईन. लहानपणी पोहण्याच्या स्पर्धेसाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आलो होतो. त्यानंतर आता पहिल्यांदाच अमरावतीला येतो आहे. यापुढे वन्यजीव छायाचित्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी सदैव सोबत राहील, अशी ग्वाही बैजू पाटील यांनी दिली.