प्रतिसाद अॅप, अवघ्या ६ मिनिटांत 'अलर्ट'!
By admin | Published: March 8, 2016 12:17 AM2016-03-08T00:17:15+5:302016-03-08T00:17:15+5:30
आता कुठेही संकटात सापडलेल्या आणि मदतीची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांपर्यंत अवघ्या ६ मिनिटांमध्ये पोलिसांकडून मदत पोहोचणार आहे.
स्मार्ट पोलिसिंग : सोशल मीडियाचा खुबीने वापर
अमरावती : आता कुठेही संकटात सापडलेल्या आणि मदतीची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांपर्यंत अवघ्या ६ मिनिटांमध्ये पोलिसांकडून मदत पोहोचणार आहे. पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम कमी करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘प्रतिसाद’ अॅप कार्यान्वित होणार आहे. या अॅपचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी प्रस्तावित आहे.
४.१ व्हर्जन असलेल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये प्रतिसाद पीसीआर आणि प्रतिसाद हे दोन्ही अॅप इन्स्टॉल करता येतील. यातील प्रतिसाद पीसीआर हा पोलिसांसाठी तर प्रतिसाद हे अॅप राज्यातील जनतेसाठी आहे. प्रतिसाद अॅप डाऊनलोड केल्यास संकटाच्या वेळी अवघ्या ६ मिनिटात पोलिसांना ‘अलर्ट’ जाईल. कंट्रोलरुममधील डॅशबोर्डवर तो अलर्ट ६ मिनिट दिसेल. संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना तो अलर्ट स्वीकारावा लागेल अन्यथा कंट्रोल रुमकडून संबंधित व्यक्तीकडे पोलीस कुमक पोहचेल यासाठी संबंधित व्यक्तीने प्रतिसाद अॅप डाऊनलोड करून अलर्ट देणे आवश्यक आहे. इमरजंसीत 'अलर्ट' प्रेस केल्यानंतर पोलिसांसह नोंदणी केलेल्या ३ नातेवाईकांच्या मोबाईलवर 'अलर्ट' एसएमएस जातील. याशिवाय मोबाईलधारकाचे जीपीएस लोकेशनही ट्रेस होईल. (प्रतिनिधी)
एका क्लिकवर पोलिसांचा प्रतिसाद
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खून, बलात्कार, छेडछाड, अपघात, दहशतवादी कारवाया, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी त्वरित पोलीस मदत व्हावी, याकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिसाद मोबाईल अॅप्लीकेशन सुरू होणार आहे. ‘गुगल प्ले स्टोर’मधून शहर परिसरातील नागरिकांनी ‘प्रतिसाद अॅप’ डाऊनलोड करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले आहे.
आयुक्तालयातील १२०० कर्मचारी टेक्नोसेव्ही
शहर आयुक्तालयाचे मनुष्यबळ १८०० चे जवळपास आहे. त्यापैकी १२०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ई-मेल अॅड्रेस आहेत. त्या अनुषंगाने ‘प्रतिसाद पीसीआर अॅप’मध्ये या कर्मचाऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा अॅप डाऊनलोड करून स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करायचा आहे. या अॅपमध्ये १२०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पदनाम, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक नोंदणीबध्द करण्यात आला आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला कार्यरत आहात, त्याबद्दलची माहितीही यात आहे.
४.१ व्हर्जन
प्रतिसाद आणि प्रतिसाद पीसीआर अॅप्स ४.१ व्हर्जन स्मार्ट फोनमधील प्ले स्टोरमधून डाऊनलोड करून इंस्टॉल करता येणार आहे.