वादळी पावसाने वीज पुरवठा खंडित झालेल्या ९५ टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत
By उज्वल भालेकर | Published: April 21, 2024 09:43 PM2024-04-21T21:43:44+5:302024-04-21T21:44:16+5:30
दहा दिवसांपासून अनेक गावे होती अंधारात; दुरुस्तीसाठी महावितरणने घेतली कंत्राटदारांची सेवा
अमरावती : वादळी पावसामुळे महावितरणच्या चांदूरबाजार उपविभागाअंतर्गत वीज पुरवठा खंडित झालेल्या घाट लाडकी, माधान आणि तळेगाव फिडरवरील ९५ टक्के भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या प्रयत्नांना यश आले आहे. महावितरणने वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी चार कंत्राट एजन्सींची सेवा घेतली असल्याने उर्वरित भागाचा वीजपुरवठा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोर्शी संजय वाकडे यांनी दिली आहे.
चांदूरबाजार परिसरात ९ एप्रिल रोजी झालेल्या प्रचंड वादळाचा मोठा फटका महावितरणला बसला होता. यात चांदूरबाजार उपकेंद्रातून निघणाऱ्या घाट लाडकी, माधान आणि तळवेल फिडरवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज खांब पडून आणि वीजवाहिन्या तुटून ३० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने ताबडतोब दखल घेत चार कंत्राटदार एजन्सीच्या मदतीने वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामाला गती दिल्याने दुसऱ्याच दिवशी गावठाण भागाचा शंभर टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले; परंतु शेतीपंपाच्या वीजवाहिन्यांचे पोल टू पोल पेट्रोलिंग केल्यानंतर नुकसानीचे स्वरूप आणि वीजखांब, वीजसाहित्य नेण्याची अडचण बघता शेतशिवारातून गेलेल्या वीजवाहिन्यांचे टप्प्याटप्प्याने दुरुस्ती कार्याला सुरुवात करण्यात आली.
सद्य:स्थितीत तळवेल फिडरवरील बोराळा आणि परसोडा या दोन गावांतील अंशत: भाग सोडला, तर उर्वरित या फिडरवरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. माधान फिडरवरील चांदूरबाजार येथील कृषिपंपांचे पाच रोहित्राचे काम सुरू असून उर्वरित संपूर्ण फिडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. घाट लाडकी फिडरवरील चार गावांचा वीजपुरवठा २१ एप्रिलला सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला; तर सात गावांचा वीजपुरवठा संध्याकाळी पूर्ववत झाला. त्यामुळे तळवेल, घाटलाडकी आणि माधान फिडरवरील ९५ टक्के भागाचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, उर्वरित ५ टक्के भागांचाही वीजपुरवठा लवकरच पूर्ववत होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांनी दिली आहे.