प्रतिबंधित बीटीचे ‘गुजरात कनेक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:11+5:302021-06-16T04:16:11+5:30
गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात विक्री होत असलेल्या प्रतिबंधित बीटीचे ‘गुजरात कनेक्शन’ असल्याची माहिती कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाली ...
गजानन मोहोड
अमरावती : जिल्ह्यात विक्री होत असलेल्या प्रतिबंधित बीटीचे ‘गुजरात कनेक्शन’ असल्याची माहिती कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाली आहे. या बियाण्यांचा नागपूर व यवतमाळ मार्गे पुरवठा होतो आणि या व्यवहारात धामणगाव व चांदूर रेल्वे येथील बडे प्रस्थ असल्याची माहिती हाती आली आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यास ही नावे समोर येतील. शनिवारी धामणगाव तालुक्यात १४ लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त केल्यानंतर या बियाण्यांची साखळी चर्चेत आली आहे.
पेरणीच्या दिवसांत जिल्हा सीमेलगतच्या गावांमध्ये एजंट शेतकऱ्यांना आमिष दाखवून बियाण्याची विक्री करतात. जिल्ह्यात गुजरात, आंध्र व मध्यप्रदेशातून या बियाण्याचा शिरकाव झालेला आहे. प्रामुख्याने जिल्हा सीमेलगतच्या गावांमध्ये या बियाण्यांची साठवणूक केली जात आहे. गुजरात व आंध्र प्रदेशातून येणारे बियाणे चांदूर रेल्वे व धामणगाव तालुक्यात, तर मध्यप्रदेशातून येणारे प्रतिबंधित बियाण्यांचा मोर्शी व वरूड तालुक्यातून जिल्ह्यात शिरकाव होत आहे. या भागात प्रतिबंधित बियाण्यांची पेरणीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
गतवर्षी बियाणे धामणगावातील एका दुकानदाराला प्रतिबंधित बियाण्यांची गलाई, साठवणूक व पॅकिंग करताना पकडण्यात आले होते. याशिवाय अन्य राज्यांतील नागरिक या भागात मक्त्याने शेती करतात. त्यांच्याकडेही या अनधिकृत बियाण्यांचा साठा मिळाला होता. यंदादेखील या बियाणे विक्री रॅकेटची पाळेमुळे या भागात रुजल्याचे शनिवारच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. तथापि, अशा प्रकरणांच्या तपासात पोलीस विभागाचे पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची कृषी विभागाची खंत आहे.
बॉक्स
धामणगाव, देवगाव, बाभूळगाव कनेक्शन
बियाण्यांच्या विक्रीसाठी तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावांचा वापर केला जातो. कृषी विभागाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील बाभूळगाव सीमेवरून यवतमाळ जिल्हा व देवगाव सीमेवरून वर्धा जिल्हा आाहे. त्यामुळे विभागस्तरावरील कारवाई असल्यास वर्धा जिल्हा व जिल्हास्तराच्या पथकाची कारवाई असल्यास यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधित बियाणे हलविण्यात येतात.
बॉक्स
पर्यावरण कायद्याचाही भंग
एचटीबीटी (हर्बिसाईड टॉलरंट बीटी)या कापूस बियाण्यांचे राज्यात उत्पादन, विक्री, पेरणी व साठवणूक करण्यास मनाई आहे. केंद्र शासनाच्या जेनेटिक इंजिनीअरिंग अप्रूव्हल कमिटीची (जीईएसी) परवानगी नाही. त्यामुळे या बियाण्यांसाठी पयार्वरण कायदेभंगाचादेखील गुन्हा दाखल होतो. याशिवाय महाराष्ट्र कापूस बियाणे कायद्याचे विविध कलमांखाली गुन्हा दाखल होतो.