वातावरण बदलाचा परिणाम, रबीच्या पेरण्या खोळंबल्या
By Admin | Published: December 6, 2015 12:08 AM2015-12-06T00:08:40+5:302015-12-06T00:08:40+5:30
खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती.
नवे संकट : आठवड्यात पेरणी क्षेत्रात १२ टक्केच वाढ
अमरावती : खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती. परंतु ऐन पेरणीच्या हंगामात महिन्याभऱ्यापासून सतत वातावरण बदलत आहे. थंडीच्या दिवसात उष्णतामान वाढल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांच्या मागे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.
यंदाच्या खरीपाचा हंगामात दीड महिना उशीरा पाऊस व नंतर पावसात खंड यामुळे खरीपाचा हंगाम महिन्याभऱ्याने माघारला. त्यामुळे रबीचा हंगाम देखील माघारला. त्यात पावसाच्या दिवसात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमीनीत आर्द्रता नाही, तसेच कपाशीवर ‘लाल्यांचा’ प्रादुर्भाव यामुळे कपाशीचे उत्पन्नात कमी झाली. महिन्याभऱ्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तुर पिकांवर देखील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी झालेल्या हरभऱ्याची वाढ खुंटली आहे. व ‘भर’ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. डिसेंबर महिन्यातही थंडी नसल्याने गव्हाची पेरणी खोळंबली आहे. थंडीच्या अभावाचा परिणाम हरभऱ्याप्रमाणेच तुर पिकावर देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी कृषि विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यापैकी ९७ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी झालेली आहे. पेरणीची ही ६६ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात पेरणीची ५५ टक्केवारी होती म्हणजेच एका आठवड्यात रबीच्या पेरणीत फक्त ११ टक्कयांनी वाढ झाली आहे. हे १५ हजार ७९६ हेक्टर क्षेत्र आहे.
गव्हाची पेरणी रखडली
गव्हाच्या उगवणशक्तीसाठी व वाढीसाठी वातावरणात थंडी आवश्यक आहे. मात्र महिन्याभऱ्यापासून थंडीचा अभाव असल्याने अद्याप प्रस्तावित क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रातील गव्हाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच विहिरींची कमी होत असलेली पातळी व दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे ओंबीवर असणाऱ्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.याचाही काही प्रमाणात परिणाम होऊन गव्हाचे क्षेत्र कामी होत आहे.