निकालापूर्वीच गुणांकनाचे गोडवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:57 PM2018-03-12T22:57:42+5:302018-03-12T22:57:42+5:30
‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत. देशभरातील ४०४१ शहरांच्या तुलनेत शहराची डायनॅमिक रॅकिंग ४२ अशी असल्याचा दावा होत असून प्रत्यक्षात ती रॅकिंग केवळ स्वच्छता अॅपवर आधारित असल्याची वस्तुस्थिती नाकारली जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात शहर देशभरात ४२ व्या क्रमांकावर असल्याचे ढोल बडवायचे आणि प्रत्यक्षात निकाल अपेक्षेनुरुप लागला नाही तर अधिनिस्थ यंत्रणेवर त्याचे खापर फुटू नये, या भूमिकेतून प्रशासनाने ४२ व्या रॅकिंगची वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी अपेक्षा अमरावतीकरांकडून व्यक्त होत आहे.
गतवर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात एकूण ५०० शहरांपैकी अमरावती २३१ व्या क्रमांकावर राहिले होते. त्या अनुषंगाने यंदा महापालिकेने जोरकस प्रयत्न केले. फेब्रुवारीत क्युसीआयच्या चमुने शहराची स्वच्छताविषयक तपासणी केली. या सर्वेक्षणात देशातील ४०४१ शहरे सहभागी झाली आहेत. १० मार्च रोजी संपुष्टात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल एप्रिल अखेर वा मे च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. तत्पूर्वी केंद्रशासनाने स्वच्छता अॅपवर आधारित शहराचे डायनॅमिक रॅकिंग दैनंदिन प्रसिद्ध केले. यात शहराची बेस्ट रॅकिंंग २४ होती. १० मार्चला ते रॅकिंग ४२ व्या क्रमांकावर गेले.
तथापि ते रॅकिंंग संपूर्ण देशभरातील असल्याचा भ्रम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहर ४२ व्या क्रमांकावर असल्याची हाकाटी पिटविली जात आहे. पहिल्या २५ मध्ये असल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला. मात्र ते रॅकिंग ४०४१ शहरांच्या तुलनेत नव्हे तर केवळ स्वच्छता अॅपचा वापर आणि १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधील असल्याची वस्तुस्थिती नाकारण्यात आली. शहर २०० वा ३०० व्या क्रमांकापर्यंत गेल्यास ४२ वा क्रमांक सांगून दिशाभूल तर करण्यात आली नाही ना ? असा सवाल व्यक्त होऊ शकतो. देशभरात स्वच्छतेच्या बाबतीत ४२ व्या क्रमांकावर असल्याचे सांगून अनेकजण उर बडवून घेत आहेत. तथापि वस्तुस्थिती वेगळीच आहे.
तीन घटकांवर रॅकिंग
स्वच्छता अॅप युझर एंगेजमेंट, एजन्सी रिस्पॉन्सिव्हनेस व युझर हॅपीनेस या तीन घटकांवर डायनॅमिक रॅकिंंग रोजच्या रोज ठरविली गेली. त्यासाठी १ एप्रिल २०१७ ते १० मार्च २०१८ या कालावधीतील अॅप डाऊनलोडिंग,तक्रारींचे निराकरण आणि नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय विचारात घेण्यात आला. त्यानंतर स्वच्छता अॅपवर आधारित शहराची डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात आली. ४००० गुणांंच्या स्वच्छता सर्वेक्षण परीक्षेशी त्या रॅकिंगचा सुतराम संबंध नाही.