जिल्हा परिषदेच्या पाच संवर्गांचा निकाल जाहीर; १९ संवर्गाचा बाकी, उर्वरित निकालाकडे लक्ष
By जितेंद्र दखने | Published: January 24, 2024 07:02 PM2024-01-24T19:02:28+5:302024-01-24T19:03:30+5:30
अमरावती जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ६५८ पदांसाठी २५ हजारांवर अर्ज दाखल झाले होते.
अमरावती: मिनी मंत्रालयातील क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यांनंतर रिंगमन, वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्ग परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, परीक्षा झालेल्या २४ संवर्गापैकी आतापर्यंत ५ संवर्गाचा निकाल जाहीर झाला असला तरी १९ संवर्गाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, तर पाच संवर्गाची परीक्षा अद्याप झालेली नाही.
अमरावती जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ६५८ पदांसाठी २५ हजारांवर अर्ज दाखल झाले होते. नियोजनाअभावी अनेकदा परीक्षा लांबणीवर पडली.त्यामुळे पुढील तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने विविध संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर आता बहूुप्रतीक्षेनंतर पाच संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा‘आयबीपीएस’ कंपनी घेण्यात येवून निकाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे सुपुर्त केला. त्यानुसार हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. परीक्षा झालेल्या उर्वरित पदांच्या निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यावर आता निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सामान्य प्रशासनाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी केले आहे.