निवृत्त डीएचओला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; अरिअर्स काढण्यासाठी मागितली होती लाच
By प्रदीप भाकरे | Published: August 30, 2022 06:25 PM2022-08-30T18:25:29+5:302022-08-30T18:31:07+5:30
२००६ चे लाच प्रकरण : १० हजारांची मागितली होती लाच
अमरावती : वेतनवाढीचे अरिअर्स काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची मागणी करून पैकी २५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या निवृत्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक ३ आर. व्ही. ताम्हणेकर यांनी ३० ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. डॉ. सुरेश रामकृष्ण ठाकरे (७२) असे शिक्षाप्राप्त आरोपी लाचखोराचे नाव आहे.
विधीसुत्रानुसार, २० फेब्रुवारी २००६ रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनातच एसीबीने सापळा यशस्वी केला होता. यातील फिर्यादी डॉ. अनिल झामरकर हे त्यावेळी धारणी येथे कार्यरत होते. त्यांनी मॅटकडे वेतनवाढीबाबत केस दाखल केली होती. त्यात त्यांना वेतनवाढ मिळाली. सबब, चार वर्षांच्या वेतनवाढीच्या ४० हजार रुपये अरियर्स द्यावे, असा अर्ज त्यांनी तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ठाकरे यांच्याकडे दिला. त्यासाठी ठाकरे यांनी १० हजार रुपये लाच मागितली. पैकी २ फेब्रुवारी २००६ रोजी २५०० रुपये स्विकारले.
बिल निघण्यापुर्वी देय लाचेचे २५०० रुपये २० फेब्रुवारी रोजी ठाकरे स्विकारणार होते. त्यापुर्वी झामरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याच दिवशी स्वत:च्या दालनात ठाकरे यांनी २५०० रुपये स्विकारले. ती लाचेची रक्कम जप्त करून त्यावेळी ठाकरेंविरोधात गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी २००८ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
आठ साक्षीदार तपासले
न्यायालयीन सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. यातील डॉ. रामदास ताटे हा साक्षीदार फितूर झाला. न्या. ताम्हणेकर यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून डॉ. सुरेश ठाकरे यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा ठोठावली. शासकीय अभियोक्ता सुनिल देशमुख यांनी युक्तीवाद केला. एसीबीच्या वतीने राजेश कोचे यांनी पैरवी केली.