सेवानिवृत्त न्यायाधीशांचा चौकशी अहवाल अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:01 PM2018-07-22T23:01:47+5:302018-07-22T23:02:13+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बडतर्फ शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चिदानंद बेहेरा यांच्याविरुद्ध तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी चौकशी केली. बेहेरांविरुद्ध एकही आरोप सिद्ध होऊ शकले नाही, असा चौकशी अहवाल त्यांनी दिला. मात्र, बडतर्फीची कारवाई झाल्यामुळे विद्यापीठाला सेवानिवृत्त न्यायाधीशांचा चौकशी अहवाल अमान्य असल्याचा सूर उमटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बडतर्फ शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चिदानंद बेहेरा यांच्याविरुद्ध तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी चौकशी केली. बेहेरांविरुद्ध एकही आरोप सिद्ध होऊ शकले नाही, असा चौकशी अहवाल त्यांनी दिला. मात्र, बडतर्फीची कारवाई झाल्यामुळे विद्यापीठाला सेवानिवृत्त न्यायाधीशांचा चौकशी अहवाल अमान्य असल्याचा सूर उमटला आहे.
विद्यापीठाने १४ मुद्द्यांवर बेहेरांची चौकशी न्या. रोही यांच्याकडे १० जून रोजी सोपविली. त्यांनी काही तक्रारकर्त्यांसोबत थेट संवाद साधून माहिती जाणून घेतली. बेहेरांवरील एकही आरोप सिद्ध होऊ शकले नाही, असा चौकशी अहवाल विद्यापीठाकडे सोपविला. बेहेरांनी विनापरवानगीने सिमेंट ओटा बांधल्याप्रकरणी ही तक्रार होती. परंतु, सन २०१४ च्या निर्माणाधीन ओट्याची तक्रार २०१६ मध्ये कशी केली, याबाबत बेहेरांनी एससी, एसटी आयोगाकडे दाद मागितली. कठोर कारवाईसाठी विद्यापीठात पूर्वग्रह निश्चित होते, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. न्या. रोहींचा अहवाल प्रकाशात आल्यानंतर विद्यार्थ्यांची तक्रार व त्यांचे स्वाक्षरी असलेले बयाण तसेच विद्यापीठात नसताना ५ फेब्रुवारी २०१६ रोजी निलंबन आणि २४ एप्रिल २०१८ रोजी बडतर्फीची कारवाई कोणाच्या मर्जीने झाली, हा आता संशोधनाचा विषय ठरू लागला आहे.
बेहेरांवर हे होते आरोप
सच्चिदानंद बेहेरा यांंच्यावर १४ आरोप झाले. यात विनापरवानगी ओटा बांधणे, विद्यापीठविरोधात विद्यार्थ्यांची पोलिसांत तक्रार, विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, पैशांची मागणी, नियमबाह्य बांधकाम, विद्यार्थीनींकडून स्वच्छतागृह साफ करणे, मुस्लिम विद्यार्थ्यांना शिवीगाळ, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दिवाळी सत्रानंतर अभ्यासक्रम न घेणे, ब्लेझर, न्यूजपेपर, अॅन्टिव्हायरससाठी पैशांची मागणी आदी आरोप होते. यातील एकही आरोप चौकशीत सिद्ध होऊ शकले नाही.
सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून प्राप्त चौकशी अहवालानुसार बेहेरांवर कुलगुरूंच्या अधिकारात बडतर्फीची कारवाई झाली. जे काही आरोप होते, त्यांची चौकशी नियमानुसार झाली. तब्बल अडीच वर्षे चौकशी चालली.
- अजय देशमुख, कुलसचिव
माझ्यावरील १४ पैकी एकही आरोप चौकशी समितीपुढे सिद्ध झाला नाही. बडतर्फीची कारवाई पूर्वग्रहदूषित होती. यासंदर्भात राष्ट्रीय एससी, एसटी आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.
- सच्चिदानंद बेहेरा, बडतर्फ प्राध्यापक, शा.शि. विभाग