निवृत्त पीएसआयला महिलांचा चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:34 PM2018-01-06T23:34:33+5:302018-01-06T23:35:23+5:30
विनयभंग केल्याचा आरोप करीत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला महिलांनी बेदम मारहाण केली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विनयभंग केल्याचा आरोप करीत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला महिलांनी बेदम मारहाण केली. त्याच त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेल्या. दुपारी १ वाजता न्यायालयापुढील मार्गावर घडलेल्या या घटनेत परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या.
महिलांच्या तक्रारीनुसार, चार ते पाच महिला एका वकिलाला भेटणार होत्या. न्यायालयापुढील मार्गाच्या कडेला उभे सेवानिवृत्त बळीराम राठोड यांना त्यांनी चिठ्ठी दाखवून वकिलाचा पत्ता विचारला. राठोड यांनी ‘एक हजार रुपये देतो, माझ्यासोबत चलणार का?’ असे शब्द वापरल्याचे महिलांचे म्हणणे आहे. हा प्रकार घडताच महिलांनी राठोड यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर आॅटोत टाकून फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नेले. गाडगेनगर हद्द असल्याने महिलांनी राठोड यांना गाडगेनगर ठाण्यात नेले.
राठोडविरुद्ध सापळा?
त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली. राठोड यांच्या तक्रारीनुसार, काही महिला चिठ्ठी घेऊन त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी पत्ता विचारला. माहिती नसल्याचे सांगताच महिलांनी मारहाण करून मोबाइल व पाच हजार रुपये हिसकावून घेतल्याचे राठोड यांचे म्हणणे आहे. महिला व राठोड यांच्यात झालेल्या वादामुळे गाडगेनगर ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी दोघांचीही बाजू ऐकून त्यांना तक्रार देण्यास सांगितले. महिला व राठोड यांनी परस्परविरोधी तक्रारी पोलिसांत केल्या.
महिलांच्या तक्रारीवरून बळीरकाम राठोड यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ दाखल करण्यात आले, तर बळीराम राठोड यांच्या तक्रारीवरून महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३९५, ३६३, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सत्यता पडताळणीनंतर अटक करू, असे सांगितले. दरम्यान, बळीराम राठोड गेल्या काही महिन्यांत पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांची महिलांविषयी वागणूक चांगली असल्याची ग्वाही पोलीस वर्तुळातून दिली जात आहे. याप्रकरणी विरोधकांनी त्यांच्यासाठी सापळा रचल्याची चर्चा शनिवारी सुरू होती.
आयुक्तांवर ओढले होते ताशेरे
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक अवैध व्यवसायांना बळ देत असल्याचा आरोप बळीराम राठोड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एक तर शहरातील अवैध व्यवसाय बंद करा, अन्यथा मला पोलीस आयुक्तालयासमोरच अवैध व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी द्या, असा तक्रार वजा इशारा राठोड यांनी दिला होता. यासंबंधी निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांसह गृहराज्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे पाठविले होते.
‘महिलांनी विनाकारण केली मारहाण’
बळीराम राठोड यांच्या म्हणण्यानुसार, ते कोर्टाजवळ वकिलांसोबत बोलत होते. यादरम्यान महिलेने चिठ्ठी दाखवून पत्ता विचारला. त्यांनी ती चिठ्ठी वकिलाजवळ दिली. मात्र, तुम्हाला पत्ता विचारला, तुम्हीच सांगायला हवे, असा पवित्रा घेत महिलांनी अचानक मारहाण करून पैसे व मोबाइल हिसकला. त्यानंतर आणखी काही नागरिक गोळा झाले आणि त्यांनीही मारहाण करीत मला आॅटोत बसवून पोलीस ठाण्यात नेले.