सेवानिवृत्त शिक्षकांची सेवापुस्तिकांना उधळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:38+5:302021-09-03T04:12:38+5:30
फोटो - कडू ०१ सप्टेंबर पी परतवाडा : जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना वेळेवर दरमहा ...
फोटो - कडू ०१ सप्टेंबर पी
परतवाडा : जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना वेळेवर दरमहा पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही सेवानिवृत्त आजारी शिक्षकांचा यामुळे औषधोपचारही थांबला आहे. यातील काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवापुस्तिका उधळीणे खाल्ली. यात नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत पाच आणि धारणी पंचायत समिती अंतर्गत आठ प्रकरणे असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांच्या या महत्त्वपूर्ण दस्तावजकडे संबंधित यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे, असा आक्षेप सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कॅफो चंद्रशेखर खंडारे यांच्याकडे मांडला.
सेवानिवृत्त शिक्षकांपैकी काहींची निवडश्रेणीची प्रकरणे निकाली निघालेली नाहीत. ते शिक्षक आजही निवडश्रेणीपासून वंचित आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अजून मिळालेला नाही. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांकरिता दरमहा महिन्याला जिल्हा परिषद स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर पेन्शन अदालत घेतल्या जात होती. या पेन्शन अदालतीमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आपल्या अडचणी मांडत होते. पण, दोन वर्षांपासून कोरोनाच्या नावाखाली ही पेन्शन अदालत संबंधित प्रशासकीय यंत्रणेने घेतलेलीच नाही.
पेन्शन पाच तारखेपर्यंत करण्यात यावी. पेन्शन अदालत सुरू करण्यात यावी. सेवापुस्तिका, निवडश्रेणीची प्रकरणे निकाली काढावी. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने निवेदनातून केली. यावेळी बी.आर. गुंड, शिवहरी भोंबे, व्ही.बी. तुरखडे, रमेश मेश्राम, बांबोळे, व्ही.एस. बहाळे, डी.ए. घुलक्षे, रमेश भोरे, जे.के. वैराळे, एच.पी. खैर, भारत पेंढारकर, रतन काशीकर, संतू बेठे आदी उपस्थित होते.
---------------