राठोडसह तिघांचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:15+5:302021-06-18T04:10:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील सुमारे सहा लाख शेतकरी, शिक्षक व अन्य खातेदारांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...

Retirement benefits of three including Rathore 'locked' | राठोडसह तिघांचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ ‘लॉक’

राठोडसह तिघांचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ ‘लॉक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यातील सुमारे सहा लाख शेतकरी, शिक्षक व अन्य खातेदारांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रशासकीय वर्तुळ गुन्हे दाखल झाल्याने कमालीचे घाबरले आहे. बँकेच्या तत्कालीन सीईओंसह एकूण पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध १५ जून रोजी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेल्या तीन अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे एकूणच लाभ थांबविण्यात आले आहेत.

जिल्हा बँकेने केलेल्या ७०० कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली दिली गेली. याप्रकरणी बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी. राठोड, निधी व लेखा अधिकारी निळकंठ बी. जगताप, मुख्य अधिकारी (प्रशासन) सुधीर ब. चांदूरकर, सांख्यिकी अधिकारी राजेंद्र गणेशराव कडू, लेखा विभागातील कर्मचारी रोहिणी सुभाष चौधरी यांच्यासह शेअर व म्युचुअल फंडचे दलाल अजितपाल हरिसिंग मोंगा, नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, शोभा मधुसूदन शर्मा, शिवकुमार गोकुलदास गट्टाणी व राजेंद्र मोतीलाल गांधी यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व १२० ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, जानेवारी महिन्यात हे दलाली प्रकरण उघड झाल्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी सांख्यिकी अधिकारी राजेंद्र कडू यांना निलंबित करण्यात आले. लेखा विभागातील महिला कर्मचाऱ्याची मुख्य कार्यालयात बदली करण्यात आली. आता त्या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.

एकट्यावरच निलंबनाची कारवाई

राजेंद्र कडू यांना १९ जानेवारी रोजी याच प्रकरणामुळे निलंबित करण्यात आले. कडूंसह अन्य चार अधिकारी कर्मचाऱ्यांवरदेखील लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर १० फेब्रुवारी २०२१ रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले जे.सी. राठोड हे सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी, सुधीर चांदूरकर हे डिसेंबर २०२० मध्ये निवृत्त झाले. सोबतच जगतापदेखील नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. हे आर्थिक अनियमिततेचे प्रकरण उघड झाल्यानंतर या तीनही निवृत्त अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे आर्थिक लाभ थांबविण्यात आले आहेत.

-----------

अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

३.३९ कोटी रुपयांची दलाली दिल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले, तर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते, या भीतीपोटी काहींनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड चालविली आहे. आर्थिक गुन्हे शाखादेखील तपासाला वेग देणार आहे.

---------

पूर्वीच कडू यांना निलंबित करण्यात आले, तर गुन्हे दाखल झालेल्या तिघा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ थांबविण्यात आले. ज्या कार्यरत कर्मचारी महिलेविरुद्ध गुन्हे दाखल झाले, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे.

- संदीप जाधव, प्राधिकृत अधिकारी, जिल्हा बँक, अमरावती

Web Title: Retirement benefits of three including Rathore 'locked'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.