केंद्रांवर लसींसाठी रेटारेटी, दोन दिवस पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:19+5:302021-05-01T04:12:19+5:30
अमरावती : कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी आबालवृद्धांसह ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, लसींचा साठा ...
अमरावती : कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी आबालवृद्धांसह ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, लसींचा साठा अल्प असल्याने केंद्रावर नंबर लावण्यासाठी रेटारेटी करीत आहे. शुक्रवारी जिल्ह्याकरिता १३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असला तरी तो दोन दिवस पुरेल इतकाच आहे. रविवारी लस संपलेली असेल.
कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा राज्य शासनाकडून अल्प प्रमाणात होत आहे. शुक्रवारी केवळ कोविशिल्ड उपलब्ध झाली. परंतु, ज्या नागरिकांना लसींचा दुसरा डोज कोव्हॅक्सिन घ्यायचा आहे, त्यांना केंद्रावर लस मिळाली नव्हती. अमरावती, बडनेरा शहरात एक-दोन लसीकरण केंद्रांवरच कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील केंद्रांवर लस पुरविण्यात येते.
१४ तालुके, महापालिका हद्दीत व खासगी दवाखान्यात लसींचा पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात केला जातो. लसींच्या अत्यल्प पुरवठ्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिक रांगेत ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र अनुभवता आले. शुक्रवारी महापालिका लसीकरण केंद्रावर सकाळी ११ नंतर लस पोहोचली होती.
ऑनलाईन नोंदणी, आधार कार्ड तपासणीनंतर लस टोचली जाते. मात्र, केंद्रावर लस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. शासकीय आणि खासगी अशी जिल्ह्यात ७३ लसीकरण केंद्रे आहेत.
--------------
अशी आहेत लसीकरण केंद्रे
महापालिका : ११
खासगी दवाखाने : ११
जिल्हा रुग्णालय : ४
ग्रामीण परिसर : ४९
------------------
असे झाले शुक्रवारी लसींचे वाटप
अमरावती महापालिका : ३६००
अमरावती तालुका : ६००
अचलपूर : ९००
अंजनगाव सुर्जी : ६००
दर्यापूर : ७००
धारणी : ३००
चिखलदरा : २००
मोर्शी : ६००
वरूड : ८००
तिवसा : ६००
चांदूर रेल्वे : ६००
धामणगाव रेल्वे : ७००
भातकुली : ६००
चांदूर बाजार : ७००
नांदगाव खंडेश्वर : ८००
खासगी रुग्णालय : ९००
----------------------
कोट
आरोग्य सहसंचालकांकडे जिल्ह्यासाठी चार लाख लसींची मागणी केली होती. त्यापैकी शुक्रवारी १३ हजार लसी प्राप्त झाल्या. दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. सोमवारी नव्याने लस उपलब्ध होईल, असे संकेत आहेत.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी