परतवाड्यात दुकानदारांच्या प्रशासनासह कोरोनाला वाकुल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:43+5:302021-04-18T04:12:43+5:30
लोकमत रियालिटी चेक नियमांची ऐसीतैसी पथक बेपत्ता, शटर बंद मात्र दुकाने उघडी नरेंद्र जावरे परतवाडा : सध्या संपूर्ण राज्यात ...
लोकमत रियालिटी चेक
नियमांची ऐसीतैसी पथक बेपत्ता, शटर बंद मात्र दुकाने उघडी
नरेंद्र जावरे
परतवाडा : सध्या संपूर्ण राज्यात कोरोना लॉकडाऊन आहे. मात्र, परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरातील लहानच नव्हे तर मोठ्या दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवून प्रशासन व कोरोनाला वाकुल्या दाखविल्या. त्यात ते स्वत:चीही फसवणूक करीत असल्याचे चित्र शनिवारी शहराचा फेरफटका मारला असता दिसून आले. यादरम्यान पालिकेचे पथक फिरताना आढळून आले नाही. दुकानांचे अर्धे शटर उघडलेले व आत ग्राहक असल्याचा कारभार दिवसभर सुरू होता.
राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने कठोर पावले उचलण्यात आली आहेत. अमरावती शहरात स्मशानात दहनक्रिया करण्यासाठीही जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. परंतु त्यानंतरही जिल्ह्यातील परतवाडा शहरात नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र शनिवारी दिवसभर होते. परतवाडा शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जयस्तंभ चौकपासून पुढे दुराणी चौक, सदर बाजार, गुजरी बाजार आदी प्रमुख मार्गावरील हार्डवेअर, कापड व्यावसायिक, इलेक्ट्रिक, चप्पल जोड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने, बुक डेपो परदेसी भैयांची लस्सी दुकाने जवळपास उघडीच होती.
बॉक्स
अर्धे शटर डाऊन, ग्राहक अंदर
औषधी व अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने वगळून सर्व दुकाने व सेवा बंद ठेवण्याचा आदेश आहे. मात्र, परतवाडा शहरातील कापड व्यावसायिक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने अर्धवट उघडी ठेवून प्रशासनासह कोरोनाला वाकुल्या देत उघडे होते. काही ठिकाणी अर्धे शटर उघडून बाहेर एक माणूस बसविण्यात आला आणि तो दुकान सुरू असल्याचे ग्राहकांना सांगत असल्याचेही दिसून आले. दुकानात ग्राहक, अर्धे शटर डाऊन असा हा प्रकार होता.
बॉक्स
शनिवारची सुट्टी की, पथक बेपत्ता?
कोरोना काळात काटेकोर नियम पाळण्यासाठी नगरपालिका, महसूल आदी जवळपास विविध विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. दुकाने उघडी दिसताच कारवाई करण्याचे त्यांना अधिकार आहेत. अचलपूर नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी आठवड्याच्या सुरुवातीला पाच दुकाने सील केली होती. परंतु शनिवारी दिवसभर पथके दिसून आली नाही किंवा पथकाने कारवाई केल्याचेही समजले नाही. यामुळे पथकाला शनिवारची सुट्टी की, बेपत्ता यावर शहरात चर्चा होती.