परतीच्या पावसाने घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:23+5:30
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : जिल्ह्यात मोसमी पाऊस सर्वत्र संततधार कोसळल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अगोदर संततधार पावसाने पिकांवर आलेल्या रोगराईने हाहाकार माजविला. त्यात सखल भागातील काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. आता परतीचा पाऊस आला, तर तूर, सोयाबीन, मिरची पिकांसाठी तो धोकादायक ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड केली होती. मात्र, यंदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसात ही पिके कोलमडून पडली. सोयाबीन पीक यंदा कमी पावसामुळे येणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने अर्धा पावसाळा उलटल्यावर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीपासून पावसाने कहरच केला. यादरम्यान संततधार पावसाने अनेकदा शेतात पाणी साचले होते. या साचलेले पाण्याने पिकांवर निरनिराळ्या रोगांनी खरीप पिके धोक्यात आली, शिवाय ती पिवळी पडली.
आधीच सततच्या पावसाने खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु, आता सोयाबीन पीक हातात आले असताना, ऐन मळणीच्या वेळीच परतीचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. हाती काहीच आलेले नसल्याने तूर, कपाशी पिकावर आलेल्या रोगाकरिता औषधाची फवारणी कशी करावी, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे आहे.
तालुक्यात सोयाबीन पिकावर रोग आला असल्याने कुठे पिकांमध्ये जनावरे घातली, तर काही शेतकऱ्यांनी तीन महिन्यांची वाया जाऊ नये म्हणून मिळेल ते पीक काढून घेण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यांना अवघे एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन पीक मिळत आहे.
कोरोनाकाळात प्रदूषणाला आळा बसल्याने पाऊस चांगला कोसळण्याचे भाकीत वर्तविले जात होते. त्यानुसार पाऊसदेखील कोसळला. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. खरिपाच्या सुरुवातीपासून पिकांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र, आज पीक घरात येताना मोबदला तर दूर, खर्च निघणेही कठीण झाले आहे.