परतीचा पाऊस, सोयाबीनचे मातेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:59 PM2022-10-11T22:59:37+5:302022-10-11T23:00:02+5:30
यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाने पुन्हा रिपरिप लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने गंज्या भिजल्या तर शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन सडायला लागल्याने मातेरे झाले झाले आहे. प्रतवारी खराब झाल्याने व्यापारी पडून मागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी करून गंजी लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन सडायला लागले आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगामधून बिजांकुर फुटत आहे. याशिवाय उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनची कायिक वाढ झाल्याने शेंगा कमी व पोचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसाने सोयाबीनची प्रतवारी कमी झालेली आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून मागत आले. महिनाभरापूर्वी ५ ते ६ हजारांपर्यंत असलेला भाव आता चार हजारांवर आलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतमाल पडून मागत असल्याने नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
अर्ध्याअधिक तुरीवर ‘मर’
सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे शेतात तलाव साचल्याने तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ‘मर’ रोगाने तूर जागेवरच सुकायला लागली आहे. जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरवर हे संकट ओढावलेले आहे. तुरीला यंदा चांगला भाव असताना पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कपाशीवर बोंडसड अन् बोंडअळी
सततच्या पावसाने कपाशीच्या बोंडावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये बोंड सडून गळ सुरू झालेली आहे. याशिवाय शेतात पाणी साचल्याने ‘पॅराविल्ट’मुळे कपाशी जागेवरच सुकायला लागली आहे. याशिवाय बोंडअळीला पोषक वातावरण असल्याने प्रादुर्भाव वाढला.