परतवाडा-इंदूर मार्गावर कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात, चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 05:29 PM2017-09-21T17:29:04+5:302017-09-21T17:29:54+5:30
परतवाडा ते इंदूर मार्गावर घटांगनजीक कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांनी पेट घेतला. या दोन्ही वाहनांचा अक्षरश: कोसळा झाला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झालेत.
परतवाडा, दि. 21 - परतवाडा ते इंदूर मार्गावर घटांगनजीक कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांनी पेट घेतला. या दोन्ही वाहनांचा अक्षरश: कोसळा झाला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झालेत. ही घटना गुरूवारी दुपारी १२.३० वाजता घडली. परिणामी या मार्गावरील सर्व वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.
पथ्रोट येथून खकनारसाठी जाणा-या टाटा ४०७ ला विरूद्ध दिशेने भरधाव येणा-या कारची धडक बसली. क्षणात कारने पेट घेतला. कारमधील दोन पुरूष व दोन महिला जखमी झाल्याने ट्रकचालक अ.राजीक अशफाक (रा.पथ्रोट) यांनी त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत ट्रकनेही पेट घेतला होता. दोन्ही वाहने धगधगू लागल्याने बघ्यांची गर्दी विखुरली. लगेच चिखलदरा पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत दोन्ही वाहनांची राखरांगोळी झाली होती. पथ्रोट येथून खकनारसाठी जाणा-या ट्रकमध्ये संत्री भरण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे रिकामे कॅरेट होते. अपघातग्रस्त ट्रकचा क्रमांक एम.एच.-४३एफ.७५९१ असून कार मात्र पूर्णत: जळाल्याने नंबर व जखमींची नावे वृत्त लिहेस्तोवर मिळू शकली नव्हती.
वाहतूक ठप्प...
परतवाडा-धारणी-इंदूर मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. आग आटोक्यात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली. कारमधील जखमी प्रवाशांना अचलपूर व चिखलदरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल न केल्याने त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. चिखलदरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.