परतवाडा, तिवस्यात संपूर्ण दारुबंदी
By admin | Published: April 6, 2017 12:04 AM2017-04-06T00:04:47+5:302017-04-06T00:04:47+5:30
अमरावती : हायवेवरील ५०० मीटर अंतरावरील सर्व प्रकारची दारु दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशाचा फटका : जिल्ह्यात मद्यविक्रीच्या ३९८ दुकानांना टाळे
अमरावती : अमरावती : हायवेवरील ५०० मीटर अंतरावरील सर्व प्रकारची दारु दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार परतवाडा व तिवस्यात संपूर्ण दारूबंदी झाली असून यादोन्ही शहरांत एकही दुकान खुले नसल्याने अवैध मद्यविक्रीला उधाण आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने काटेकोर अंमलबजावणी केली आहे. परिणामी १ एप्रिलपासून मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नाही. बहुतांश मद्यविक्री परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, याबाबत शासनाकडून अद्यापही सुधारित आदेश नाहीत. त्यामुळे ‘एक्साईज’ला शासनादेशाची प्रतीक्षा आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परवानाधारक मद्यविक्रेत्यांनी याप्रकरणात पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी एक्साईज कार्यालयात गर्दी केली आहे. जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यात परतवाडा व तिवसा शहरात नव्या आदेशामुळे एकही दारू दुकान सुरु करता आले नाही. १ एप्रिलपासून सर्व मद्यविक्री दुकानांना टाळे लागले आहे. हायवेवर ५०० मीटरच्या आतील बाधित मद्यविक्री परवानाधारकांना ही दुकाने बंद करण्याबाबत ‘एक्साईज’ने नोटीस बजावून आधीच अवगत केले होते. मात्र, काही दुकानांना अंतरमोजणीमध्ये काठावर अभय मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परतवाड्यात दारूबंदीमुळे मद्यपींना अचलपूर शहरात जाऊन दारु रिचवावी लागत असल्याचे दिसून येते. तिवसा येथे अवैधरित्या दारू विकली जात आहे.
अवैध मद्यविक्रीला उधाण
जिल्ह्यात ४८२ पैकी ३९८ मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्यामुळे अवैध विक्रीला उधाण आले आहे. अव्वाचा सव्वा दरात मद्यविक्री होत आहे. दारू दुकानांवर खरेदीसाठी उसळणारी गर्दी बघता काही मद्यपी चढ्या दरात दारु खरेदी करीत आहेत. रामनवमीच्या दिवशी मंगळवारी ‘ड्राय डे’ असताना अवैध दारुविक्रीला जोर आला होता. आता पोलीस, एक्साईज विभागाला अवैध दारूविक्री रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
‘वाईन शॉप’ भोवती पोलिसांचा बंदोबस्त
बडनेरा शहरात एकच वाईन शॉप बाधित होण्यापासून वाचले आहे. त्यामुळे या दुकानावर मद्यपींची मोठी गर्दी उसळली आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दारु खरेदी करण्यासाठी मद्यपींनी रेल्वेस्थानक मार्ग बंद केला होता. परिणामी विदर्भ एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. अखेर पोलीस बंदोबस्तात हे मद्यविक्रीचे दुकान बंद करण्याचा प्रसंग ओढवला, हे विशेष.