२१ कोटींचा महसूल बुडणार

By admin | Published: March 30, 2015 12:08 AM2015-03-30T00:08:08+5:302015-03-30T00:08:08+5:30

जिल्ह्याला रेती लिलावातून महसूल देणाऱ्या धामणगाव तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही झाला नाही़ पुढील काळात लिलावाची शक्यता कमी .

Revenue of 21 crores will drop | २१ कोटींचा महसूल बुडणार

२१ कोटींचा महसूल बुडणार

Next

मोहन राऊ त  अमरावती
जिल्ह्याला रेती लिलावातून महसूल देणाऱ्या धामणगाव तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही झाला नाही़ पुढील काळात लिलावाची शक्यता कमी असल्याने तब्बल २१ कोटी रूपयांचा महसूल बुडणार आहे़ दरम्यान चार हजार कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली असून आतापर्यंतच्या रेतीघाट लिलावात हा पहिलाच प्रकार असल्याने याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल तालुक्यातील बांधकाम व्यावसायकांनी केला आहे़
जिल्ह्यात महसूल विभागाने यंदा सन २०१४-१५ या चालू वर्षात ८१ रेती घाटांच्या लिलावाची निर्धारित रक्कम तब्बल ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार ५६५ रूपये व १ लाख ९ हजार ५५३ ब्रास रेतीच्या लिलावाचे उदिष्ट समोर ठेवले होते़ या अंतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला असला तरी आजपर्यंत सर्वाधिक किमतीच्या धामणगाव तालुक्यातील रेतीघाटांकडे सर्वच कंत्राटदारांनी यावर्षी पाठ फिरविली आहे़
उपासमारीची पाळी
धामणगाव तालुक्यातील सहा घाटांच्या लिलावासाठी आजपर्यंत ई- निविदा बोलविण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाकडे रेतीघाट घेणारे कंत्राटदार फिरकले नाहीत. २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ८७४ रूपये अशी किंमत ठेवण्यात आल्यामुळे कंत्राटदारांनी याकडे पाठ फिरविली. विशेषत: रेती घाट सुरू झाले तेव्हापासून पहिल्या वर्षात जिल्ह्यातील ४ कोटी ७६ लाख ४२ हजार रूपयांपैकी १ कोटी १८ लाख ५१ हजार इतकी १० हजार ७२४ ब्रास रेतीची रक्कम केवळ धामणगाव तालुक्याची होती़ तर दुसऱ्या वर्षात जिल्ह्यासाठी असलेल्या निर्धारीत १५ कोटी ७१ लाख रक्कमेपैकी १ कोटी ८८ लाख ९० हजार रूपयांची पाच घाटांची निर्धारीत रक्कम होती़
तसेच या वर्षात ही रक्कम तब्बल दहापटीने वाढली आहे़ या वाढत्या दरामुळे रेतीघाटांचा लिलाव घेण्यास कोणीच अद्यापही पुढे आले नाही़ जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात धामणगाव तालुका अग्रेसर आहे़ येथील रेती उत्खनन व बांधकामावर मजुरी करणारे अनेक कुटूंब आहेत़ गेल्या तीन महिन्यांपासून रेतीचा लिलाव न झाल्यामुळे बांधकाम पूर्णत: ठप्प आहेत़ या तालुक्यातील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे़ विकासात्मक कामे देखील रेतीमुळे बंद झाली आहेत. पुढेही काही दिवस धामणगाव तालुक्यातील रेतीघाटांचे लिलाव होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे़ त्यामुळे तुर्तास तरी मजुरांच्या हाताला काम मिळेल आणि बांधकामाला गती मिळेल, याची शक्यता दिसत नाही. रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया तत्काळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आठ पटीने वाढली किंमत
जिल्ह्यात रेतीघाटांची किंमत यंदा आठ पटीने वाढली आहे़सन २०१२-१३ मध्ये महसूल विभागाने ५३ घाट लिलावासाठी काढले होते़ ८९ हजार ७४९ ब्रास रेतीची निर्धारित रक्कम ४ कोटी ७६ लाख ४२ हजार ८८९ रूपये ठेवली होती़ तर सन २०१३-१४ या वर्षात ११४ घाटांचा लिलाव महसूल विभागाने केला. १ लाख ७७ हजार ४४५ ब्रास रेतीची निर्धारीत रक्कम १५ कोटी ७१ लाख १५ हजार अशी होती़ लिलावातून आजही धामणगाव तालुक्यातील सर्वाधीक २१ कोटी रूपयांच्या सात घाटांचे लिलाव वाढत्या रक्कमेमुळे झाले नाहीत़
फिरते पथक ठरतेय नामधारी
धामणगाव तालुक्याचे अर्थकारण हे रेतीवर निर्भर आहे़ दरवर्षी या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम होते. मात्र यंदा रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे रेती तस्करीत वाढ झाली आहे़ ही वाढ महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने होत असल्याची कैफियत थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे मांडली आहे़ लिलाव न झालेल्या रेतीघाटातील रेतीची तस्करी रात्री आठ वाजतानंतर सुरू होऊन ती सकाळी सहा वाजता संपत असल्याचे बोलले जाते़ धामणगाव येथील भारतीय प्रशासकीय सेवेतील तहसीलदार राजण यांनी अवैध रेती तस्कारांविरूध्द बंड पुकारले असले तरी जी पथके निर्माण केलीत त्या पथकातील काही जण रेती तस्करांना गुप्त माहिती देत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या भागातील रेती तस्कर पकडले जात नाहीत.संबधीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे यांच्यावर आता कठोर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन वर्धा नदीकाठावरील गावाच्या ग्रामस्थांनी मंत्रालयात पाठविले आहे़
रेतीघाट लिलाव धारकांना सुरक्षा नाही
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रेतीघाटांचा लिलाव किंमत अधीक असली तरी घेण्यास हरकत नव्हती. आम्ही या रेतीघाटाचे लिलाव आजपर्यंत घेतले. परंतु गतवर्षी कोट्यवधी रूपयांत घाट घेऊनही आमची कैफियत कोणीच ऐकून घेतली नाही़ एका तक्रारदाराने तक्रार केल्यावर थेट फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले. एकीकडे शासनाला कोट्यवधी रूपयांच्या महसूलचा मोबदला आम्ही द्यावा तर दुसरीकडे कोणतीच सुरक्षा प्रशासनाकडून मिळत नाही़ असा प्रश्न गेल्यावर्षी रेतीघाट लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने निर्माण केला आहे़
गेल्या तीन महिन्यांत आपण स्वत: धामणगाव तालुक्यात अवैध रेती तस्करांविरूध्द कोंबिंग आॅपरेशन राबवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ आता रेतीघाट असलेल्या साजामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी या कामात हयगय केल्याचे उघड झाल्यास थेट निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
े़-नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी.
भूजल सर्वेक्षण विभागाने केला प्रताप
वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यातील नायगाव, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, विटाळा, दिघी महल्ले हे घाट येतात. महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी या घाटांच्या लांबी-रूंदी, चौरस मीटर मोजण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर महसूल विभागाने या घाटातील रेतीच्या ब्रासचे मोजमाप करण्याचे आदेश भूजल सर्वेक्षण विभागाला दिले होते. या विभागाने तालुक्यातील पाच घाटातील रेतीची खोली मोजून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. एकीकडे या तालुक्यात बगाजी सागर धरण असल्यामुळे वर्धा नदीला हवे त्या प्रमाणात पूर येणे बंद झाले आहे़ तसेच गतवेळी पावसाचे अल्प प्रमाण असल्यामुळे रेतीचा साठा नसताना दुसरीकडे भूजल सर्वेक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी अर्धा मीटर खोलीवर असलेली रेती यंदा तब्बल दीड मीटर पर्यंत उत्खननासाठी येत असल्याचा अहवाल प्रशासनाला दिला आहे.

Web Title: Revenue of 21 crores will drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.