अवैध वीटभट्ट्यांना महसूल विभागाचे अभय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:14 AM2019-01-25T01:14:08+5:302019-01-25T01:14:30+5:30
परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, ......
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, अशी मागणी असताना महसूल विभागाचे याला अभय का, असा सवाल त्रस्त भाविक व कामगार करीत आहे.
वीटभट्ट्यांचा व्यवसाय बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. अमरावती शहराला वाहतुकीस सोयीचे जात असल्याने याच भागातील विटा बांधकामाकरिता वापरण्यात येते. यातील काही वीटभट्ट्या नियमसंगत चालू आहेत. मात्र, बहुतांश शासकीय जागेत अवैध वीटभट्ट्या सुरू केल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरतो. परिणामी आजूबाजूच्या पिकांवरसुद्धा त्याला विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. तसेच विटा भाजल्यानंतर स्थलांतरण करताना मोठ्या प्रमाणात धूळ वातारवणात पसरल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोंडेश्वर मार्गालगच एक्सप्रेस हायवे असल्याने जड वाहनांसह अनेक वाहने धावतात. यावरदेखील धुळीचा परिणाम जाणवत आहे.
या परिसरात प्रसिद्ध असलेले कोंडेश्वर देवस्थानात भाविकांची नियमित दर्शनाकरिता जे-जा सुरू असल्याने या मार्गावरील अवैध वीटभट्ट्या शासनाने त्वरित हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
महसूल विभाग घेतील काय दखल?
कोंडेश्वर मार्गावरील अवैध वीटभट्ट्या हटविण्यासंदर्भात 'लोकमत'ने वारंवार हा मुद्दा लोकदरबारात मांडला. मात्र, महसूल विभागाने यावर अपेक्षित कारवाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आता तरी याची दखल महसूल विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा त्रस्त भाविकांनी व्यक्त केली आहे.
वीटभट्यांच्या उष्णतेने उन्हाळा होणार असह्य
उन्हाळ्याच्या दिवसांत वीटभट्या सुरू झाल्यानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचे चटके असह्य होऊ लागतात. त्यामुळे अवैध वीटभट्ट्या हटविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
तहसीलदारांनी जाणावे गांभीर्य
कोंडेश्वर तसेच जुना बायपास मार्गावरून भाविक व कामगारांना उन्हाळ्यात ये-जा करणे फार कठीण जाते. शरीर भाजल्यागत वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी एमआयडीसीतील कामगारांनी केली आहे.