महसूलचे कामकाज आजपासून ठप्प; कामबंदमध्ये ७२ नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 04:05 PM2023-04-02T16:05:54+5:302023-04-02T16:06:06+5:30
अमरावती : नायब तहसीलदार यांना राजपत्रित वर्ग -२ चे ४,८०० रुपयांचे ग्रेड पे लागू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील ७२ ...
अमरावती : नायब तहसीलदार यांना राजपत्रित वर्ग -२ चे ४,८०० रुपयांचे ग्रेड पे लागू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील ७२ नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांनी ३ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल सेवा ठप्प होणार आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या माध्यमातून ३ मार्च २०२३ पासून कालबद्ध आंदोलन सुरु आहे. आता ३ एप्रिलपासून राज्यभरातील महसूल अधिकारी राज्यभर कामबंद आंदोलन करीत आहेत. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागत असल्याचे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष निता लबडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
यापूर्वी महसूल मंत्री, वित्त मंत्री व अपर सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आाश्वासन देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी शासनाने केली नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रृटी समितीने नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे ४८०० रुपयांनी वाढविण्याबाबत सादरीकरण करुनही संघटनेचा मागणीचा विचार करण्यात आलेला नसल्याने महसूल अधिकाऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.