सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 1, 2023 05:40 PM2023-11-01T17:40:47+5:302023-11-01T17:41:52+5:30
सुधारीत ५३ पैसेवारी : १३७८ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी जाहीर
अमरावती : ऐन हंगामात पावसाची तूट व पीकवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात मोठा खंड यामुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील सुधारित पैसेवारी ५३ टक्के विभागीय आयुक्तांद्वारा मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये १३७८ गावांत दुष्काळसदृश स्थिती दर्शविण्यात आली तर ५८६१ गावांमध्ये ५० टक्क्यांवर पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
विभागात यंदाच्या पावसाळ्यात फक्त यवतमाळ जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. उर्वरित चार जिल्ह्यांत १५ ते ३२ टक्क्यांपर्यंत तूट राहिलेली आहे. माॅन्सून उशिरा आल्याने पेरणीला महिनाभर झालेला उशीर व त्यानंतर पिकेवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवसांपर्यंत अनेक तालुक्यात पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज ६० पैसेवारी २८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती.
यामध्ये सुधारणेला वाव असल्याने ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणाऱ्या सुधारित पैसेवारीत विभागाचे काय चित्र राहते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अमरावती जिल्ह्यातील ४९४, वाशिम जिल्ह्यातील ७९३ व बुलडाणा जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी विभागीय आयुक्तांद्वारा जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ५८६१ गावांतील दुष्काळसदृश स्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
५० टक्क्यांवर पैसेवारी असलेली जिल्हानिहाय गावे
अमरावती जिल्ह्यात १४९६ गावांत ५४, अकोला जिल्ह्यात ९९० गावांमध्ये ५३, यवतमाळ जिल्ह्यात २०४६ गावांमध्ये ५४ व बुलडाणा जिल्ह्यात १३२९ गावांमध्ये ५५ तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विभागातील ७२३९ गावांमध्ये सरासरी ५३ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.